Karad North Assembly Election 2024 सातारा :महाराष्ट्राच्या राजकारणात सातारा जिल्ह्यातील नेत्यांची भूमिका कायम महत्त्वाची राहिली आहे. सातारा जिल्ह्यात फलटण, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, सातारा, पाटण, कोरेगाव, माण हे मतदारसंघ आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांना उमेदवारी दिली आहे. तर, त्यांच्या विरुद्ध भाजपनं मनोज घोरपडे (Manoj Ghorpade) यांना उमेदवारी दिली आहे.
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाची फेररचना होण्यापूर्वी 1999, 2004,या विधानसभा निवडणुकांमध्ये बाळासाहेब पाटील विजयी झाले होते. तर, 2009 ला मतदारसंघांची फेररचना झाली होती. त्यानंतरच्या पुढील तीन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी जिंकल्या आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात कराड, सातारा, कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील गावांचा समावेश होतो. 2009 ला राष्ट्रवादी काँग्रेसनं बाळासाहेब पाटील यांच्या ऐवजी अतुल भोसले यांना उमेदवारी दिली होती. मात्र, बाळासाहेब पाटील यांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली. त्यानंतरच्या दोन निवडणुका बाळासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिंकल्या होत्या. आता राष्ट्रवादी फुटल्यानंतर बाळासाहेब पाटील शरद पवारांसोबत आहेत.
बाळासाहेब पाटील यांच्या विरुद्ध उमेदवार देण्यासाठी जागा मिळावी यासाठी महायुतीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, ही जागा भाजपकडे गेली. भाजपमध्ये याजागेसाठी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांचं नाव चर्चेत होते. ऐनवेळी कराड उत्तर मतदारसंघातून भाजपनं यावेळी मनोज घोरपडे यांना उमेदवारी देत 2019 मध्ये झालेली चूक दुरुस्त केली. 2019 च्या निवडणुकीत भाजपकडे धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांनी उमेदवारी मागितली होती. भाजपनं अधिकृत उमेदवार म्हणून धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली. मनोज घोरपडे यांनी अपक्ष निवडणूक लढवली. मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांचा पराभव झाला होता. मनोज घोरपडे दुसऱ्या स्थानी तर धैर्यशील कदम तिसऱ्या स्थानी राहिले होते.
बाळासाहेब पाटील : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार
मनोज घोरपडे- भाजप
श्रीपते कांबळे- बसपा
अंसारअली पटेल - वंचित बहुजन आघाडी
सर्जेराव बनसोडे - आरपीआय-ए
सीमा पोतदार- राष्ट्रीय स्वराज्य सेना
सोमनाथ चव्हाण - रासप
अजय सुर्यवंशी - अपक्ष
दीपक कदम- अपक्ष
निवृत्ती शिंदे- अपक्ष
बाळासो पाटील-अपक्ष
बाळासो शिवाजी पाटील- अपक्ष
रामचंद्र मारुती चव्हाण- अपक्ष
वसिम इनामदार- अपक्ष
वैभव पवार- अपक्ष