शाळेच्या वेळेबाबत शासनाचे आदेश, वेळ न पाळल्यास थेट शाळांवर कारवाईचा इशारा
GH News December 07, 2024 01:08 PM

School Timing Rules: राज्यात शाळांबाबत महाराष्ट्र शासनाने मागील वर्षी महत्वाचा निर्णय घेतला होता. राज्यातील शाळा सकाळी 7 वाजता शाळा न भरवता 9 वाजेनंतर शाळा सुरु करावी, असे आदेश काढले होते. मुलांची झोप पूर्ण होत नसल्याने शाळेत सकाळी अभ्यास करण्यात त्यांना उत्सुक्ता वाटत नाही, असा अभिप्राय राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण प्रेमी, पालक, तसेच प्रशासनातील अधिकारी यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर काही शाळांकडून या नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे सकाळी 9 वाजेपूर्वी शाळा भरली तर थेट कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाने सर्व माध्यमांच्या शाळा प्रशासनाला दिले आहेत.

शासनाने काढला आदेश

शासनाने पहिली ते चौथीपर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळा सकाळी नऊ वाजेनंतर भरवण्याचा आदेश दिले होते. परंतु संस्था चालक शाळा दोन शिफ्टमध्ये भरवतात. त्यामुळे सकाळी सात वाजेपासून शाळा सुरु करतात. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. यासंदर्भात आदेश काढल्यानंतरही त्याचे पालन होत नाही. त्यामुळे आता शासनाने पुन्हा आदेश काढला आहे. नऊनंतर शाळा भरवण्याच्या आदेशाचे पालन करा, अन्यथा शाळांवर कारवाईसाठी तयार राहा, असा इशारा शिक्षण विभागाने सर्वच माध्यमांच्या शाळा प्रशासनाला दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम

सकाळी नऊ वाजेपूर्वी वर्ग भरवल्यास विद्यार्थ्यांची झोप होत नाही. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन विद्यार्थी चिडचिड करतात असे निरीक्षण एका अहवालातून समोर आले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने हा आदेश काढला आहे. मागील वर्षी 5 डिसेंबर रोजी राजभवनात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान तत्कालीन राज्यपाल महोदय रमेश बैस यांनी सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना केली होती. त्यानंतर त्यावर व्यापक चर्चा झाली.

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून शाळांच्या वेळेचा अभ्यास करण्यात आला. त्यानंतर शाळांची वेळ बदलण्याची शिफारस केली. हिवाळा व पावसाळ्यात लवकर उठून शाळेत जावे लागत असल्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडत असल्याचे या संस्थेने म्हटले होते.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.