Pune Crime : शिक्षिकेकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; पुण्यातील नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार
esakal December 29, 2024 12:45 AM

पुणे - शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याच्या अज्ञानाचा फायदा घेत त्याला स्वतः सोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणाऱ्या २७ वर्षीय शिक्षिकेला खडक पोलिसांनी गजाआड केले आहे. गंज पेठेतील एका नामांकित शाळेत हा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संबंधित शिक्षिकेवर पोलिसांनी लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पॉक्सो) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

खडक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार शाळेच्या आवारात शुक्रवारी उघडकीस आला. पीडित मुलगा हा भवानी पेठ परिसरात राहतो. तो शुक्रवारी शाळेत दहावीच्या प्रिलियम परीक्षेसाठी आला होता. आरोपी शिक्षिका ही त्या शाळेत शिक्षिका असून ती धानोरी येथे राहते.

मुले शाळेत असताना त्यांची पालकत्वाची जबाबदारी शिक्षक या नात्याने तिच्यावर असते हे माहीत असताना देखील अल्पवयीन विद्यार्थ्याला तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आरोपी शिक्षिकेने त्याला तिच्यासोबत शाळेच्या आवारातच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले.

ही माहिती मिळाल्यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने संबंधित शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच तिला अटकही करण्यात आली. या ठिकाणी वरिष्ठ पोलिसांनी भेट दिली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक तोंडे करत आहेत.

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.