चंद्रपूर : राज्यात महाशिवरात्रीनिमित्ताने शिव मंदिरामध्ये भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. पण, चंद्रपूरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये काही भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त वैनगंगा आणि वर्धा नदीच्या पात्रात आंघोळीसाठी गेलेल्या 3 सख्ख्या बहिणींसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बुधवारी (26 फेब्रुवारी) चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि राजुरा तालुक्यामध्ये या घटना घडल्या. महाशिवरात्रीनिमित्त घडलेल्या या अपघातामुळे शोककळा पसरली आहे. (Mahashivratri Six people drowned in two separate incidents in Chandrapur)
हेही वाचा : CM Fadnavis : विधिमंडळ समित्यांवर फक्त भाजप आमदारांची नियुक्ती; शिंदे, अजित पवारांचे काय?
महाशिवरात्री निमित्त बुधवारी दुपारच्या सुमारास चंद्रपूर येथील प्रकाश मंडल हे आपल्या कुटुंबातील 8 जणांसह गडचिरोली मार्गावरील व्याहाड येथील वैनगंगा नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते. यावेळी नदी पात्राचा अंदाज न आल्याने 3 सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला. तसेच, या कुटुंबातील इतर सदस्य कसेबसे वाचल्याचे सांगितले गेले. मिळालेल्या माहितीनुसार, कविता मंडल, प्रतिमा मंडल आणि लिपिका मंडल असे या तीन बहिणींचे नावे आहेत. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने खोलात गेल्या आणि बुडाल्या. तसेच, एक मुलगा आणि महिलाही प्रवाहात खडकाला धरुन राहिल्याने बचावले.
दुसरी घटना दुपारच्या सुमारास राजुरा तालुक्यामधील वर्धा नदीच्या चुनाडा घाटावर घडली. यामध्ये 3 तरुणांचा मृत्यू झाला. वर्धा नदी राजुरा आणि बल्लारपूर तालुक्यांच्या सीमेवरून वाहते. महाशिवरात्री निमित्त गावातील काही लोक नदी घाटावर अंघोळीसाठी गेले होते. यातील 3 तरुण नदीच्या दुसऱ्या काठावर आंघोळीसाठी गेले आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 17 वर्षीय तुषार शालिक आत्राम, 20 वर्षीय मंगेश बंडू चणकापुरे आणि 18 वर्षीय अनिकेत शंकर कोडापे यांचा समावेश आहे. राजुरा आणि बल्लारपूर पोलीस मिळून नदी पाण्यात मृतदेहांचा शोध घेत आहेत.