मुंबई : गेल्या काही वर्षांपासून नोकरदार वर्गाचा गुंतवणुकीचा आवडता आणि लोकप्रिय पर्याय म्हणून म्युच्युअल फंडमधील एसआयपीकडं पाहिलं जात होतं. जानेवारी महिन्यातील एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 26000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. मात्र, याचवेळी गेल्या काही दिवसांमध्ये 61 लाख एसआयपी खाती बंद झाली आहेत. यामुळं शेअर बाजार घसरत असताना एसआयपी खातेदारांनी नेमकी काय भूमिका घ्यावी, गुंतवणूक सुरु ठेवावी का? योग्य फंड कसा निवडावा याबाबत तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेणार आहोत.
शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांमध्ये घसरण सुरु आहे.या कारणामुळं ज्यांनी गेल्या एक वर्षापासून एसआयपी सुरु करुन जे यूनिट मिळवले होते त्याचं मूल्य घटलं आहे. यामुळं एनएव्ही देखील घटला आहे. यामुळं एसआयपी गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचं मूल्य घटलं आहे. गेल्या सहा महिन्यातील घसरणीचा आढावा घेतला तर स्मॉल कॅप, मिड कॅप, नॅरो थिमेटिक या अधिक जोखीम असलेल्या फंडमध्ये घसरण पाहायला मिळाली. तर, लार्ज कॅप फंडमध्ये तुलनेनं कमी घसरण झाली.
शेअर बाजारात घसरण होत असली तर एसआयपीच्या गुंतवणूकदारांनी चिंता करण्याची गरण्याच नाही. जेव्हा शेअर बाजार घसरतो, त्यावेळी कमी किमतीमध्ये अधिक यूनिट खरेदीची संधी देखील असते. यामुळं तुमच्या गुंतवणुकीची सरासरी काढता येते. तात्कालिक घसरणीमुळं जे गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून याकडे पाहतात त्यांना चिंता करण्याची गरज नाही.
तुम्ही जर एसआयपी करताना दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन गुंतवणूक केली असेल आणि यामध्ये 10 ते 12 टक्के सीएजीआरचा विचार करुन गुंतवणूक करत असाल तर चिंता करण्याची गरज नाही. बाजारात पुन्हा तेजी येऊ शकते.
जे गुंतवणूकदार असेट अलोकेशनचा विचार करत नाहीत, अधिक जोखीम असणाऱ्या फंडमध्ये एसआयपी सुरु करताना दीर्घकालीन विचार करण्याऐवजी मर्यादित कालावधीचा विचार करतात. म्हणजेच जे मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडमध्ये एसआयपी करुन चांगल्या रिटर्नच्या मागं धावत आहेत. त्यांना त्यांचा इक्विटी पोर्टफोलिओ संतुलीत करण्याची गरज आहे.
वेल्थ मॅनेजर्सच्या मतानुसार गुंतवणूकदारांनी एसआयपी सुरु करण्यापूर्वी गुंतवणुकीचा कालावधी, जोखीम उचलण्याची क्षमता, विद्यमान पोर्टफोलिओ याचा विचार करणं गरजेचं आहे. इक्विटीमधील गुंतवणूक दीर्घकालीन असते. ज्यामध्ये तेजी घसरण या चक्रातून जावं लागतं. यासाठीचा कालावधी किमान पाच वर्षांचा असतो. जे गुंतवणूकदार अस्थिरता सहन करु शकत नाहीत त्यांना लार्ज कॅप ओरिएंटेड इक्विटी फंड, हायब्रिड फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा पर्याय आहे.
मिड कॅप, स्मॉल कॅप एसआयपी निवडणाऱ्यांना उच्च अस्थिरता, जोखीम, ठराविक कालावधीनंतर होणारी घसरण यासाठी तयार राहायला हवं. मिड कॅप स्मॉल कॅप इक्विटी एसआयपी एकूण गुंतणुकीच्या 25 – 40 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये.
इतर बातम्या :
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
अधिक पाहा..