नवी मुंबई : शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं नवी मुंबईतील 26500 घरांच्या विक्रीसाठी माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना आणली होती. या योजनेसाठी बुकिंग शुल्क भरणाऱ्यांची संख्या देखील 26000 हा आकडा पार करु शकला नाही. म्हणजेच सिडकोनं जितक्या घरांच्या विक्रीसाठी मागवले तितके देखील अर्ज आले नाहीत. प्रत्यक्ष बुकिंग शुल्क भरणाऱ्या अर्जदारांची संख्या 21399 इतकी होती. 19 फेब्रुवारी 2025 ला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये 19518 अर्जदारांना घरं लागली. सिडकोनं उरलेल्या 1881 अर्जदारांना देखील घरं देण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यातील काही जणांनी घरं नाकारण्याची भूमिका घेतल्याचं समोर आलं होतं. सिडकोनं इतकी प्रसिद्धी करुन देखील कमी प्रतिसाद का मिळाला हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
सिडकोनं सुरुवातीला घरांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली तेव्हा 236 रुपये भरुन नोंदणी करण्यास सांगितलं. सिडकोच्या घरांसाठी वेबसाईटवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या दीड लाखांच्या पार गेली होती. मात्र, सिडकोनं प्रत्यक्ष घरांच्या किमती जाहीर केल्या तेव्हा 55 हजारांहून अधिक अर्जदारांनी नोंदणी शुल्क भरलं. हा टप्पा पार झाल्यानंतर बुकिंग शुल्क जमा करण्याचा पर्याय देण्यात आला. 31 जानेवारीपर्यंत बुकिंग शुल्क भरणाऱ्यांची संख्या 21399 इतकी झाली. म्हणजेच जितकी घरं विक्रीसाठी काढली त्यापेक्षा कमी अर्जदारांनी बुकिंग शुल्क भरलं. याचं प्रमुख कारण घरांच्या किमती हे आहे. सिडकोनं घरांच्या किमती जाहीर केल्यानंतर अर्जदारांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. मात्र, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी जी किंमत निश्चित करण्यात आली होती त्याचं समर्थन करत घरांच्या किमती कमी होणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळं अर्जदारांनी सिडकोच्या घराच्या सोडतीकडे पाठ फिरवली.
सिडकोच्या सोडतीसाठी सुरुवातीला 1 लाख 60 हजारांहून अधिक अर्जदारांनी नोंदणी केली. मात्र, किंमत आणि ठिकाण यामुळं केवळ 21399 अर्जदारांनी बुकिंग शुल्क भरलं. सिडकोनं काढलेल्या लॉटरीच्या पहिल्या राऊंडमध्ये 12420 अर्जदारांना घरं लागली. यानंतर दुसऱ्या फेरीत 613 , तिसऱ्या फेरीत 404 आणि चौथ्या फेरीत 6081 अर्जदारांना घरं लागली.
या योजनेसाठी अर्ज मागण्याची सुरुवात पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात झाली होती. त्यानंतर सिडकोडनं 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती. सिडकोनं ज्या प्रकारे प्रसिद्धी दिली त्या तुलनेत प्रतिसाद मिळाला नसला तरी 19518 घरांची सोडत ही आतापर्यंतची मोठी सोडत ठरली आहे.
इतर बातम्या :
अधिक पाहा..