खूप महिन्यांनी शेत सोडून मुंबईला आले होते... आणि मुंबईला आले, की कामांचा ढीग लागलेला असतो समोर. एकेका महिन्याची कामं चार-पाच दिवस सलग थांबून सकाळी ७ ते रात्री १२ काम करून संपवायची आणि परत इकडे यायचं. असाच कामांचा डोंगर संपवायला मुंबईला येत होते. सकाळी महाबळेश्वरवरून निघाले, दुपारी पुण्याला घरी जेवले आणि आठच्या सुमारास मुंबई गाठली.
मुंबईला आले, की कुठलं तरी एक जेवण अनुया या माझ्या मैत्रिणीच्या घरी ठरलेलं असत. त्यातून मी शेतावरून येत असेन, तर मग तर पहिला स्टॉप तिच्या घरी असतो. शेवटचं भेटल्यापासून ते आजपर्यंतच्या गप्पा.
तिच्या घरीच जेवण आणि मगच माझ्या घरी जाऊन मुंबईला समोर जायची तयारी (‘समोर जायची’ यासाठी म्हणते आहे, की शेतावरच्या आमच्या आयुष्याचा वेग आणि मुंबईचा वेग- हवा- पाणी - खर्च या सगळ्यामध्येच जमीन- अस्मानाचा फरक आहे. मुंबई पोसते, जगवते हे खरं असलं, तरी सध्या तिकडे श्वास घेणं कठीण झालंय हेही खरंच आहे.)
तर अनुयाच्या घरी पोचले. थकले होतेच.. दिवसभराचा प्रवास झाला होता.. गाडी लावत असताना आमच्या समोरच्या चिखली गावातल्या गंगूताईंचा फोन आला, ‘हेलो, कशा आहात?’ माझ्या चेहऱ्यावर आनंद होता. कारण सहसा त्यांचा फोन येत नाही. गावामध्ये जर जत्रा किंवा पूजा असेल तर बोलवणं करायला फोन असतो.
‘ताई तुम्ही कुठे आहात?’ त्यांच्या आवाजामध्ये घाई होती.
‘मी जस्ट मुंबईला पोचते आहे.. बोला ना काय झालंय?’
‘अहो, ताई वणवा लागलाय… पूर्ण घर पेटलंय तुमचं.. स्वप्नील दादांना फोन लावला; पण लागत नाहीये. शेजारी गुरुजी पण नाही आहेत.. शेतावर कोणी आहे का?’
त्या बोलत होत्या; पण मला नीट कळत नव्हतं. घर पेटलंय... घर पेटलंय.. दोनच शब्द कानात घुमत होते. डोकं सुन्न झालं होतं. गेली पाच वर्षं डोळ्यांसमोर तरळत होती... काय नाही केलंय या घरासाठी?
घर... माझ्या आयुष्यातलं स्वतःचं असं पहिलं घर.
अगदी पहिल्यांदा जेव्हा आम्ही शेतावर आलो, तेव्हा सातबारावर घराची नोंद होती; पण शेतावर ‘घर’ म्हणून जे होतं, ते एक पडकं, छत फाटलेलं, आजूबाजूच्या विटांवरती कसंबसं उभं असलेलं काहीतरी होतं.
पण एक गोष्ट मात्र लख्ख आठवते आहे... त्या पडक्या खोलीला चारी बाजूंनी पिवळ्या फुलांनी गच्च भरून टाकलं होतं. घरात आतमध्ये जायला आम्हाला तासभर लागला. आजूबाजूचं गवत साफ करण्यातच तेवढा वेळ गेला. आत गेलो आणि पहिल्यांदा जाणवला तो म्हणजे गारवा...
कारण घराची एक भिंत ही डोंगराला चिकटून आहे. आमचं घर म्हणजे डोंगराचाच एक भाग जणू. ‘अर्थ शिप हाऊस’ म्हणतात याला. याचे फायदे खूपच असतात. दिवसा बाहेर ऊन असतं, तेव्हा डोंगर - रात्रभराची साठवलेली थंडी घरामध्ये सोडतो आणि रात्री बाहेर थंडी असली, की दिवसभराची साठवलेली ऊब भिंतीमधून झिरपत राहते.
आम्ही आतमध्ये आलो.. आणि गोष्टी कितीही पडक्या असल्या; भिंतीवर फक्त शेवाळंच नाही, तर अनेक वर्ष कोणाचाच त्रास नसल्यामुळे, अक्षरशः झाडं उगवलेली असली, तरी आमच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. स्वप्नील आणि मी एकमेकांकडे पाहिलं.. आणि काहीही न बोलता आम्हाला समजलं- आम्ही आमच्या ‘पहिल्या घरात’ पाऊल ठेवलंय.
शेत आम्ही विकत घेतलं तेव्हा ‘साफ जमीन’, ‘चकाचक जमीन’ विकण्याच्या नादात, आधीच्या लोकांनी तिला पूर्ण टक्कल केलं होतं. दिवसभर उन्हात काम केल्यावर सावलीला कुठे बसायचं हा प्रश्न होता. तेव्हा ते पडकं झोपडंसुद्धा घरासारखंच वाटलं.. घरासारखंच काय घरच होतं ते!
परत गंगूताईंचा आवाज कानात घुमायला लागला, ‘ताई.. ऐकू येतंय का? कोणीच नाहीये का शेतावर?’
शेतावर आमचा केअरटेकर होता. मी घाईघाईने त्याला फोन लावला. तो गाडी घेऊन महाबळेश्वरलाला गेला होता आणि रस्त्यात गाडीच टायर फाटलं म्हणून मेकॅनिकला शोधत होता... खाली काय चालू आहे याची त्याला जराशीही कल्पना नव्हती...
(क्रमशः)
मैत्रीण पुरवणीबाबत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
पत्ता : maitrin@esakal.com