सालंकृत मराठीपण लेऊन
अचूक खुर्चीत येऊन बसलेल्या
वासंतिक गर्दीसमोर उभे राहून
दोन्ही बाहू पसरत तो विश्वनेता
उद्गारला : ‘माझ्या मराठी भगिनींना,
आणि भावांना माझ्या
प्यारभरा नमश्कार!’
गर्दीच्या देहावर तरारले रोमांच,
विश्वनेत्याने मराठी भाषेत साधलेल्या
संवादाने जणू सांस्कृतिक सरहद्दींच्या
सुमार रेषा पुसून टाकल्या, आणि
एकपणाचा दिला पुण्यप्रद संदेश.
टाळ्यांचा कडकडाट थांबेना,
मिळालेली दाद संपेना,
आनंद पोटात मायेना!
विश्वनेता मराठीत बोलला!
विश्वनेता माझ्या भाषेत बोलला!
माझी भाषा! माझी भाषा!!
आणखी एका गौरव दिनाला
आणखी कुठल्यातरी गर्दीसमोर
उभा राहिला एक महानायक
ज्यानं उजळून टाकला होता,
रुपेरी पडदा, आणि तुफानी
संवादफेकीच्या जादूमंतराने
केले होते गारुड पिढ्यानपिढ्यांचे..
तोच महानायक शाल सावरत उठला,
आणि विलक्षण मंत्रभारल्या खर्जात
म्हणाला अडखळत की,
‘‘लाभले अम्हास भाग्य
बोलतो मराठी!’’
पुन्हा एकवार गर्दीच्या हातांना
नाही उरला पारावार,
टाळ्यांचा कडकडाट थांबेना!
मिळालेली दाद संपेना!
आनंद पोटात मायेना!
आणखी मंगलमय मराठीदिनी
दुमजली ध्वनिवर्धकांच्या
दिलखेचक पेटाऱ्यांनिशी,
लखलखणाऱ्या
शेकडो पायदिव्यांच्या,
आणि पूरदिव्यांच्या उजळ प्रकाशात
विशाल रंगमंचावर थिरकणाऱ्या
त्या बहुधा शतकातील सर्वश्रेष्ठ
जागतिक कीर्तीच्या कलावंताने
एक हात उंचावत म्हटले,
‘’कसा काय मुंबाय!
आमची मुंबाय, आमची मराठी!’’
जणू सकल प्रिथिमी आंदोळली,
समुद्रच्या समुद्र हिंदकळले,
आणि हिमालयाचा माथाही लवला,
सह्याद्रीचा तर कडेलोटच जाहला!
टाळ्यांचा कडकडाट थांबेना!
मिळालेली दाद संपेना!
आनंद पोटात मायेना!
आणखी एका आनंदपर्वात
कुण्या परदेशी गौरांगेने
भाषा, संस्कृतीची सारी कुंपणे
ओलांडत दोन तानपुऱ्यांच्या मध्ये
बैसोन सुरात म्हटले, आमच्या
ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान!
तेव्हा सूर्यमालिकेची अवस्था
अश्रूनीर वाहे डोळां अशी झाली.
दशदिशा कुंठित झाल्या,
मायमराठी सप्तसमुद्रापलिकडे
पोचल्याचा साक्षात्कार होऊन
अखिल भारतीय गर्दीचे हरपले भान.
तेवढ्यात एका भरगच्च, आणि
सकारात्मक पत्रकार परिषदेत
एक नेता सांगू लागला की,
‘‘माझ्या मराठी भाषेला आता
अभिजात दर्जा मिळाला आहे,
अभिजात मराठीचा विजय असो!’’
पत्रकारांचा जत्था
हातातल्या लेखण्या,
आणि डोळ्यापुढले कॅमेरे फेकून
उन्मादाने ओरडला, ‘‘अरे वा!
अभिजात मराठीचा विजय असो!’’
तेव्हाच,
महानगरातल्या उपनगरातल्या
उपवस्तीच्या उपगल्लीमध्ये
एक मराठी माणूस
दुसऱ्या मराठी माणसाला
खपाटीला गेलेले
पोट खाजवत म्हणाला :
‘ये मराठी भाषा बोले तो
खाने की चीज है क्या?’
दुसरा मराठी माणूस अनिच्छेनेच
पुटपुटला : ‘क्या मालूम?’