- सायली शिंदे, योगतज्ज्ञ
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे कमी वयातच अनेक मुलींना पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसॉर्डर (PCOD/PCOS) होतो आहे. अनियमित पाळी, वजनवाढ, चेहऱ्यावर नको असलेले केस, त्वचेच्या समस्या आणि मानसिक तणाव यांसारखे त्रास यामुळे जाणवतात. ही समस्या मुळातून दूर करण्यासाठी औषधांबरोबरच योगसाधना हाच प्रभावी मार्ग आहे.
प्रभावी योगासने
भद्रासन
फायदा : पेल्विक भागातील रक्तप्रवाह सुधारतो. हार्मोन्सचा समतोल राखतो आणि पाळी नियमित व्हायला मदत होते.
कसे करावे? : पाय समोर घेऊन बसा, दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना लावून घट्ट धरून ठेवा आणि गुडघे वर-खाली हलवा, जणू फुलपाखरू पंख हलवत आहे.
बालासन
फायदा : ओव्हरीज आणि गर्भाशयावर सकारात्मक परिणाम होतो. तणाव दूर होतो आणि पाठीचा ताठरपणा कमी होतो.
कसे करावे? : गुडघे टेकवून वाकून बसा, हात पुढे ताणून कपाळ जमिनीला टेकवा. शरीर पूर्ण सैल सोडा आणि शांत श्वासोच्छ्वास घ्या.
सेतुबंधासन
फायदा : पेल्विक आणि थाय मसल्स मजबूत होतात. थायरॉईड आणि हार्मोनल ग्लॅंड्स अॅक्टिव्ह होतात.
कसे करावे? : पाठीवर झोपा, पाय गुडघ्यात वाकवा आणि पाय जमिनीवर ठेवा. दोन्ही हात शरीराच्या बाजूला ठेवा आणि हळूहळू नितंब उचलून कमर वर करा. काही सेकंद थांबून परत खाली या.
अनंतासन
फायदा : हिप्स आणि साइड मसल्स टोन करतो. हार्मोनल समतोल राखतो.
कसे करावे? : एका बाजूला झोपा, एक पाय वर उचलून तो हाताने धरून ठेवा. दुसरा हात डोक्याखाली टेकवा. दोन्ही बाजूंनी करा.
मलासन, सुप्त बद्धकोनासही तुम्ही करू शकता.
प्राणायाम आणि ध्यान
अनुलोम-विलोम प्राणायाम : उजव्या नासिकेतून श्वास घ्या, डाव्या नासिकेतून सोडा. आता डाव्या नासिकेतून श्वास घ्या आणि उजव्या नासिकेतून सोडा. हे चक्र ५-१० मिनिटे करा.
भ्रामरी प्राणायाम : दोन्ही हाताच्या अंगठ्याने कान बंद करा, डोळे मिटा आणि दीर्घ श्वास घेत ‘हं’ असा आवाज करत श्वास बाहेर सोडा. मन शांत होईपर्यंत पुन्हा करा.
ध्यान : बसून डोळे मिटा, श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मन शांत ठेवा.
जीवनशैलीतील बदल
डेली रूटीन : नियमित झोप, सकस आहार आणि स्ट्रेस मॅनेजमेंट.
डाएट : गोड पदार्थ, जंक फूड टाळून हिरव्या भाज्या, फळे आणि फायबरयुक्त अन्नावर भर.
फिजिकल ऍक्टिव्हिटी : रोज किमान तीस मिनिटे योग किंवा वॉक.
पीसीओडी ही केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक तणावाशीही जोडलेली समस्या आहे. योगासने, प्राणायाम आणि मेडिटेशनच्या माध्यमातून तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडतो. तुमचे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहते आणि हळूहळू पीसीओडीवर विजय मिळवता येतो. ‘योग ही फक्त आसनांची मालिका नसून, ती मन आणि शरीर यांच्यातला संवाद आहे.’