‘अभिजात’चा निर्णय अभिमानास्पद
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मान्यवरांचा सन्मान
मुंबई, ता. २६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ कोटी मराठी भाषिकांना अभिमान वाटेल, असा निर्णय घेत मराठी भाषेला अभिजातचा दर्जा दिला, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी (ता. २६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मराठी भाषादिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. २६) चेंबूर येथे फाईन आर्ट गॅलरीत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिल्पकार पद्मविभूषण डॉ. राम सुतार, पद्मश्री अमधु मंगेश कर्णिक, पद्मश्री अशोक सराफ, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरणप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, युवा उद्योजक इंद्रनील चितळे आदींचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते माजी मंत्री नवाब मलिक, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, आमदार सना मलिक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अजित पवार म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्याकडून आपण प्रेरणा घेतली आहे. कुसुमाग्रज यांनी अनेक साहित्यकृतीची निर्मिती करून त्यांनी मराठी भाषा जिवंत ठेवली; ते मानवतेचे कवी होते. मराठी धर्म वाढवणाऱ्यांमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्र्वर आदींनी खूप मोठे योगदान दिले. त्या संतांना वंदन करतो.’
..
देशातील अन्य भाषांसोबत मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. हा एक महत्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्र प्रदेश अत्यंत भाग्यवान आहे. ‘आई’ हा शब्द केवळ मराठी भाषेत आहे. ज्यावेळी भाषा मोठी होते; त्यावेळी साहित्य आणि राज्य मोठे होते. यासाठी राज्यकर्त्यांनी साहित्य, कला, क्रीडा, ललित कला याकडे ममतेने आधार दिला पाहिजे.
- मधु मंगेश कर्णिक, कवी
माझ्या हातून जे काम झाले ते १९४७ पासून. देशात, जगात माझ्याकडून शिल्प, मूर्ती उभारण्याची कामे झाली आहेत. त्याचा आनंद होतो. माझ्या कामाबद्दल माझा आदर केला त्याबद्दल मी आनंदी आहे.
-डॉ. राम सुतार, शिल्पकार
अभिनयाच्या प्रांतात तुम्ही लवकर समाधानी होऊ शकत नाही. मी त्याच्या शोधात आहे. टीव्हीवर माझी ‘अशोक मामा’ नावाची मालिका सुरू आहे. वयाच्या ७७व्या वर्षी मी नवीन मालिका करतो. रंगभूमीचा एक वरदहस्त असतो. वाक्य बोलायला सुरू केल्यावर सर्व दुःख विसरून जातात. हा सत्कार कायम माझ्या हृदयात राहील.
- अशोक सराफ, अभिनेते
भाषादिनाच्या निमित्ताने मला पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी आभार मानतो. आम्ही सुरुवातीला खेळलो, त्यावेळी सगळे मराठी होतो. आमच्यामुळे कपिल मराठी शिकला. आता अलीकडे बरेच खेळाडू मराठीत बोलतात, त्यामुळे मराठी बोला, वाचा, कला संस्कृती जोपासा.
- दिलीप वेंगसरकर, क्रिकेटर
जगण्यासाठी हवा आणि अन्न लागते. मी झाड देतो. दिग्गजांच्या यादीत मला बसवले, मराठी असल्याचा आणि कुठलाही जात- धर्म न मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमितला असल्याचा मला अभिमान आहे. मी सगळ्या भाषेत काम करीत असलो तरी बोलताना मी मराठीत लिहून घेऊन बोलतो.
- सयाजी शिंदे, अभिनेते