‘…तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता’, संजय राऊत यांची बोचरी टीका
GH News February 27, 2025 02:11 PM

“महाराष्ट्रात गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून महिला अत्याचाराच प्रमाण कमालीच वाढलं आहे. महिलांचे अपहरण, खून बलात्काराच प्रमाण वाढलं आहे. सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या आता काय करत आहेत?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारला. पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. “पुण्यात जो घृणास्पद प्रकार घडला, त्यानंतर महिला नेत्यांनी थातूरमातूर भाष्य केलं. जर दुसऱ्याच सरकार असतं, तर या महिलांनी मंत्रालयाच्या दारामध्ये गोंधळ घातला असता. एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे, तुमची तिला पंधराशे रुपये दिले म्हणून तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“गुंडांना महिलांच वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलं आहे का? पालकमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी विचारला पाहिजे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना जाब विचारला पाहिजे. त्यांच्या काळात गुंडगिरी वाढली आहे. गुंडांना पोलीस ठाण्यात बसवायची नाटक चालली आहेत ते बंद करा” असं संजय राऊत म्हणाले. “पुण्यात सर्वात जास्त खंडणीखोरी पोलिसांची. हप्तेगिरी, अपहरण राजकीय आश्रयाखाली जे गुंडगिरी सुरू आहे, त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे आश्रय दाते यांचं त्यांना अभय आहे” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘सुदैवाने तिचे प्राण वाचले’

“पोलिसांवर दबाव आहे. बसमध्ये जो अत्याचार झाला, तो निर्भया कांड सारखा आहे. सुदैवाने तिचे प्राण वाचले. स्वारगेटला आमच्या शिवसैनिकांनी प्रखर आंदोलन केलं. त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होतील. माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे, पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या गँगना कायद्याची भीती राहिलेली नाही” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत का?’

“आमच्या काळात शक्ती कायदा आम्ही तयार केला. महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं पण सरकार का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे. आतमध्ये कोणी फिक्सर बसलेले आहेत का? हा कायदा येऊ नये म्हणून. शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, पूजा चव्हाण प्रकरणातले, त्यांच्यापर्यंत या कायद्याचे हात पोहोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.