Kalamba Jail : गुंड अमर मानेवर कळंबा कारागृहात दगडाने हल्ला; कुमार गायकवाड समर्थकांकडून प्रकार, महिला अधिकारी जखमी
esakal February 27, 2025 02:45 PM

कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये टेंबलाई उड्डाण पुलाजवळ पाठलाग करून खून करण्यात आला होता.

कोल्हापूर : राजेंद्रनगर टोळीयुद्धातील गुंड व कुमार गायकवाड खुनातील मुख्य संशयित अमर सतीश माने याच्यावर कळंबा कारागृहात (Kalamba Jail) दगडाने हल्ला करण्यात आला. त्यात तो डोक्यात दगड लागून जखमी झाला. त्याचे साथीदार न्यायाधीन बंदी सुमित स्वार्थिक कांबळे व सादीक जॉन पीटर यांनाही मारहाण करण्यात आली. हाणामारी सोडविताना तुरुंगाधिकारी स्वाती लक्ष्मण जाधवर (वय ४१) जखमी झाल्या.

याप्रकरणी तिघांविरोधात जुना राजवाडा ठाण्यात (Rajwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुना राजवाडा पोलिसांनी मारहाणप्रकरणी न्यायाधीन बंदी करण राजेंद्र पुरी, व्यंकटेश ऊर्फ विकी संजय जगदाळे व ओम मंगेश माने या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : कुमार गायकवाड खुनातील मुख्य संशयित अमर माने कळंबा कारागृहात न्यायाधीन बंदी आहे. सोमवारी सायंकाळी त्याला भेटण्यासाठी नातेवाइक आले होते. नातेवाइकांसोबतची मुलाखत संपवून माने परतत असताना करण पुरी याने हातात दगड घेऊन थेट त्याच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्याने माने भांबावून गेला. त्याला सोडविण्यासाठी आलेल्या तुरुंगाधिकारी स्वाती जाधवर यांनाही माने याचे साथीदार विकी जगदाळे व ओम माने या दोघांनी धक्काबुक्की केली.

मानेच्या दोघा साथीदारांवरही गुन्हा

वारे वसाहत परिसरात झालेल्या सुजल कांबळे याच्या खुनाच्या गुन्ह्यात अटकेत असलेला सुमित कांबळे, सादीक पीटर हे अमर माने याला सोडविण्यास आले. यावेळी त्या दोघांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. जखमींवर कळंबा कारागृहाच्या दवाखान्यात उपचार करण्यात आले.

गायकवाड विरुद्ध माने टोळीयुद्ध कारागृहात सुरूच

कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये टेंबलाई उड्डाण पुलाजवळ पाठलाग करून खून करण्यात आला होता. त्याचा पूर्वीचा साथीदार असलेल्या करण पुरी याने अमर मानेवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार कुमारच्या खुनाआधी घडला होता. कुमारच्या खुनात अमर मानेला अटक झाल्यानंतर तो न्यायाधीन बंदी म्हणून कळंबा कारागृहात आहे. वारे वसाहत येथील पैलवान ऊर्फ सुजल कांबळे हा कुमार गायकवाड गटाचा समर्थक होता. जून २०२४ मध्ये झालेल्या खुनामध्येही गायकवाड विरुद्ध अमर माने टोळीचा संबंध आला होता. आता पुन्हा कारागृहात झालेल्या हाणामारीतही या टोळ्यांचा सहभाग उघड झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.