चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु असताना टीम इंडियाचा कर्णधार बदलणार! नेमकं काय घडलं?
GH News February 27, 2025 08:13 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. 2 मार्चला भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने येणार आहेत. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार बदलण्याची वेळ येऊ शकते. मिडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याची माहिती आहे. इतकंच काय तर नीट हालचालदेखील करू शकत नाही. त्याने नेटमध्ये फलंदाजीच्या सरावादरम्यान थ्रो डाउन घेण्यासही नकार दिला. या सर्व गोष्टी पाहता न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्याला मुकण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे कर्णधारपदाची धुरा दुसऱ्या खेळाडूवर असण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रोहित शर्माला दुखापत झाली. त्याला मांडीच्या स्नायूंना दुखापत झाली असून सामन्यानंतर पत्रकार परिषदेत रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल अपडेट दिले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 26 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी जेव्हा टीम इंडिया पहिल्या सराव सत्रासाठी गेली तेव्हा रोहित शर्माला दुखापत जाणवू लागली. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने कोणत्याही कठोर शारीरिक व्यायाम केला नाही. नेटमध्ये थ्रो डाउनही खेळला नाही. सराव सत्रादरम्यान पूर्णपणे सक्रिय दिसला नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि इतर सपोर्ट स्टाफसह संघाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींमध्ये सहभागी दिसला.

टीम इंडियाचे कर्णधारपदच बदलणार नाही तर संघाच्या सलामी जोडीमध्येही बदल होईल. जर रोहित बाद झाला तर त्याच्या जागी केएल राहुल सलामीला येण्याची शक्यता आहे. गिलची तब्येत ठीक नाही. त्यामुळे तोही न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गैरहजर राहिला तर कर्णधारपदाची धुरा विराट कोहलीच्या खांद्यावर पडण्याची शक्यता आहे. कारण रोहित शर्मा कर्णधार, तर शुबमन गिल उपकर्णधार आहे. त्यामुळे या दोघांच्या गैरहजेरीत कर्णधारपदाची धुरा वरिष्ठ असलेल्या विराट कोहलीच्या खांद्यावर पडू शकते. दरम्यान, मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त असल्याची चर्चा आहे.

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद. शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.