तेल गेले तूप गेले आणि..! बांगलादेशविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तानला बसला फटका, झालं असं की…
GH News February 27, 2025 09:13 PM

चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानची सर्वच पातळ्यांवर नाचक्की झाली आहे. स्पर्धेच्या आयोजनापासून सुरक्षा, मैदानांची स्थिती, आर्थिक स्थिती आणि यजमानपद… सर्वच ठिकाणी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड तोंडावर आपटलं. त्यात निसर्गराजाचा कोपही पाकिस्तानवर झाल्याचं दिसत आहे. तिकीट विक्रीतून पैसे कमवण्याचं योजनाही भंगली आहे. भारत आणि न्यूझीलंडकडून पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता. पण नियतीने तिथेही पाकिस्तानला धडा शिकवला. हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि स्पर्धेत विना विजयाचं आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानला पराभवाचा फटका बसल्याने गुणतालिकेत शेवटच्या स्थानी विराजमान राहावं लागलं आहे. कारण बांगलादेशच्या तुलनेत पाकिस्तानचा नेट रनरेट हा खूपच कमी आहे. त्यामुळे हे नामुष्की ओढावली आणि आर्थिक फटकाही बसला आहे. आयसीसीकडून मिळणाऱ्या बक्षीस रकमेत पाकिस्तान संघाचे मोठे नुकसान झाले आहे. गतविजेत्या पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आलं आहे. आधी न्यूझीलंड आणि त्यानंतर भारताकडून पराभवाची चव चाखावी लागली.

आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निश्चित केलेल्या बक्षीस रकमेनुसार, ही स्पर्धा जिंकणाऱ्या चॅम्पियन संघाला 19.46 कोटी रुपये मिळतील. उपविजेत्या संघाला 9.73 कोटी रुपये, उपांत्य फेरीतील पराभूत संघाला 4.86 कोटी रुपये, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघांना प्रत्येकी 3.04 कोटी रुपये मिळतील. तसेच सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील संघांना प्रत्येकी 1.22 कोटी रुपये मिळतील.

पाकिस्तानचा संघ अ गटात -1.087 नेट रनरेटसह चौथ्या स्थानावर आहे. तर बांगलादेशचा संघ -0.443 नेट रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. जर संपूर्ण गुणतालिकेचा विचार केला तर इंग्लंडनेही दोन सामने गमावले आहेत. पण त्याचा नेट रनरेट हा -0.305 आहे. त्यामुळे पाकिस्तानचा गुणतालिकेत शेवटचा क्रमांक कायम असणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला फक्त 1.22 कोटी रुपये मिळणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मोठा गाजावाजा करत स्पर्धेचं आयोजन केलं. पण पाकिस्तानच्या तेलही गेल, तूपही गेलं आणि हाती धोपाटणं राहिलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.