आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील आठव्या सामन्यात अफगाणिस्तानने इंग्लंडवर 8 धावांनी थरारक विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 326 धावांचा पाठलाग करताना 317 वर रोखलं. अफगाणिस्तानाने यासह विजय मिळवला आणि इंग्लंडचा स्पर्धेतून पत्ता कट केला. अफगाणिस्तानच्या विजयामुळे आता बी ग्रुपमधील चुरस आणखी वाढली आहे. आता बी ग्रुपमध्ये उपांत्य फेरीतील 2 जागांसाठी तिघांमध्ये रंगत पाहायला मिळणार आहे. अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 2 स्थानांसाठी चढाओढ पाहायला मिळणार आहे. तर ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे.
अफगाणिस्तानने लाहोरमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडला पराभूत केलं आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवलं. दोन्ही संघांसाठी हा सामना करो या मरो असा होता. मात्र अखेरच्या क्षणी अफगाणिस्तानने बाजी मारली. अफगाणिस्ताने या विजयासह 2 पॉइंट्स मिळवले. तर दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या खात्यात प्रत्येकी 3-3 गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा ऑस्ट्रेलियाच्या तुलनेत चांगला आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट हा 2.140 असा आहे. तर ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट 0.475 असा आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. तर अफगाणिस्तानचा नेट रनरेट -0.990 असा आहे.
त्यामुळे आता उपांत्य फेरीत कोण पोहचणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. या ग्रुपमधील साखळी फेरीतील फक्त 2 सामने बाकी आहेत. अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 28 फेब्रुवारीला लाहोरमध्ये सामना होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचेल. मात्र अफगाणिस्तानसाठी हा सामनाही ‘करो या मरो’ असा असणार आहे. अफगाणिस्तानचा पराभव झाला तर त्यांचही स्पर्धेतील आव्हान संपेल, कारण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात प्रत्येकी 3-3 पॉइंट्स आहेत.
ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत व्हावं लागलं, तरीही त्यांचं स्पर्धेतील आव्हान कायम राहिलं. मात्र ऑस्ट्रेलियाला त्यानंतर दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या निकालावर अवलंबून रहावं लागेल. मात्र ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेटही दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला नाही. त्यामुळे कांगारुंचा अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला, तर त्यांना इंग्लंडच्या विजयासाठी प्रार्थना करण्याऐवजी पर्याय राहणार नाही. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहचेल.
तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्याचा निकालानंतर दक्षिण आफ्रिकेचं चित्र स्पष्ट होईल. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर विजय मिळवला तर दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत पोहचेल. मात्र अफगाणिस्तान विजयी झाली, तर दक्षिण आफ्रिकेला इंग्लंडविरुद्ध कोणत्या परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. दक्षिण आफ्रिकेचं इंग्लंडविरुद्ध पराभवातील अंतर कमी असलं तरी ते उपांत्य फेरीत पोहचू शकतात. आता काय निकाल लागतो आणि 2 कोणते संघ उपांत्य फेरीत पोहचतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.