भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. टीम इंडियाने साखळी फेरीत बांगलादेश आणि पाकिस्तानला पराभवाची धुळ चारली. टीम इंडियाने हे दोन्ही सामने 6 विकेट्सने जिंकले. त्यानंतर आता टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना हा 2 मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. टीम इंडियात दिग्गजाचं अखेर कमबॅक झालं आहे. या दिग्गजाला काही दिवसांपूर्वी वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतावं लागलं होतं.
दक्षिण आफ्रिकेचा माजी गोलंदाज आणि टीम इंडियाचा बॉलिंग कोच मॉर्ने मोर्कल भारतीय संघात परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोर्ने मोर्कल हा काही दिवसांपूर्वी कौटुंबिक कारणामुळे मायदेशी परतला होता. मात्र आता मोर्ने मोर्कल टीम इंडियाच्या कॅम्पसह जोडला गेलाय. मोर्कल परतल्याने टीम इंडियाच्या खेळाडूंना बॉलिंगचे धडे मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या बॉलिंगची धार वाढणार, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
दरम्यान ए ग्रुपमधून न्यूझीलंड आणि टीम इंडिया दोन्ही संघ अजिंक्य आहेत. दोन्ही संघांनी खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. तर दोन्ही संघांचा साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना 2 मार्चला होणार आहे. आता हा सामना जिंकून विजयी हॅटट्रिक करण्याची संधी दोन्ही संघांना आहे. तसेच विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी पोहचण्याची संधीही टीम इंडियाकडे आहे. त्यामुळे आता टीम इंडिया विजयी हॅटट्रिकसह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेते? की किवी ते स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.
न्यूझीलंड क्रिकेट टीम : मिचेल सँटनर (कॅप्टन), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनव्हे, जेकब डफी, मॅट हेन्री, कायल जेमिसन, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, विल ओरुर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन आणि विल यंग.