आयसीसी चॅम्पियन्स स्पर्धेत अफगाणिस्तानने आतापर्यंत आपल्या कामगिरीने सर्वांची मनं जिंकली आहेत. लिंबूटिंबू म्हणून गणल्या जाणाऱ्या संघाने बलाढ्य इंग्लंडला स्पर्धेच्या बाहेर फेकून दिलं आहे. इंग्लंडला अफगाणिस्तानचं आव्हान सोपं वाटत होतं. पण अफगाणिस्तानने इंग्लंडला तारे दाखवले. ब गटातून इंग्लंडचा संघ आऊट झाला असून उपांत्य फेरीच्या शर्यतील ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ आहेत. अफगाणिस्तानसाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना करो या मरोची लढाई आहे. त्यामुळे हा सामना काहीही करून अफगाणिस्तानला जिंकणं भाग आहे. पण अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्वंद्व विसरून कसं चालेल. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत मॅक्सवेलने एक हाती सामना जिंकून दिला होता. तर टी20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाची वाट रोखली होती. त्यामुळे हे द्वंद्व आता सोपं राहिलं नाही. या सामन्याचं महत्त्व ओळखून पत्रकारांना अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी प्रश्न विचारला. अष्टपैलू मॅक्सवेल विरोधात काही प्लान वगैरे आखला की नाही? त्यावर त्याने सडेतोड उत्तर दिलं.
‘तुम्हाला काय वाटतं, आम्ही इथे फक्त मॅक्सवेल विरोधात खेळायला आलो आहोत का? तुम्हाला असंच वाटतं का? आम्ही संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध योजना आखली आहे. मला माहिती आहे की मॅक्सवेलने 2023 वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळी केली होती. पण तो आता भुतकाळ झाला आहे.’, असं उत्तर शाहिदीने दिलं. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे 7 विकेट 100 च्या आत पडले होते. पण मॅक्सवेलच्या नाबाद 201 खेळीने 292 धावा गाठणं सोपं झालं. तसेच ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला.
‘वनडे वर्ल्डकपनंतर आम्ही ऑस्ट्रेलियाला टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हरवलं आहे. आम्ही विरोधी संघाबाबत असाच विचार करतो. आम्ही येथे एखाद्या खेळाडूविरोधात खेळण्यासाठी आलो नाहीत. आम्ही आमच्या योग्य रितीने वापरून प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करण्याचा मानस ठेवतो. त्यामुळे आम्ही काय मॅक्सवेल विरोधात खेळण्यासाठी आलो नाहीत. आम्ही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहोत.’, असंही शाहिदी याने सांगितलं. ‘
टमला वाटते की हा क्रिकेटसाठी एक चांगला सामना असेल आणि आमचे लक्ष गोष्टी सोप्या ठेवण्यावर असेल आणि उपांत्य फेरी खेळण्याबद्दल जास्त काळजी करू नये. आम्ही आमचे मूलभूत काम चांगले करण्याचा प्रयत्न करू.’, असंही शाहिदी पुढे म्हणाला.