मुंबई : सेन्सेक्स आणि निफ्टी आज २७ फेब्रुवारी रोजी जवळजवळ सपाट स्थितीत बंद झाले. निफ्टी सलग ७ व्या दिवशी २ अंकांच्या किरकोळ घसरणीसह लाल रंगात राहिला. सेन्सेक्स १० अंकांच्या किरकोळ वाढीसह बंद झाला. मात्र, लहान आणि मध्यम शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.९७ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक २.०९ टक्क्यांनी घसरला. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये नुकसान झाले.आजच्या व्यवहारादरम्यान औद्योगिक, रिअल्टी, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री दिसून आली. दुसरीकडे वित्तीय शेअर्समध्ये चांगली वाढ दिसून आली. व्यवहार बंद होताना सेन्सेक्स १०.३१ अंकांनी वाढून ७४,६१२.४३ वर बंद झाला. तर निफ्टी २.५० अंकांनी घसरून २२,५४५.०५ वर बंद झाला.आज २७ फेब्रुवारी रोजी बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३९२.९१ लाख कोटी रुपयांवर घसरले, जे मागील व्यापार दिवशी म्हणजे मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी ३९६.४८ लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ३.५७ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ३.५७ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.सेन्सेक्समधील ३० पैकी १३ शेअर्सच वाढीसह बंद झाले. यामध्ये बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.५९ टक्के वाढ झाली. यानंतर बजाज फायनान्स, सन फार्मा, झोमॅटो आणि टाटा स्टीलचे शेअर्स १.१७ टक्क्यांपासून २.३९ टक्क्यांपर्यंत वाढीसह बंद झाले.तर सेन्सेक्समधील उर्वरित १७ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर्स सर्वाधिक ४.९९ टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक आणि एनटीपीसी यांचे शेअर्स घसरले.