19 सामने, 8 संघ आणि 1 ट्रॉफी, Asia Cup 2025 बाबत मोठी अपडेट, इंडिया-पाकिस्तान सामन्याबाबत असा निर्णय
GH News February 27, 2025 11:14 PM

क्रिकेट विश्वात सध्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचा थरार सुरु आहे. ए ग्रुपमधून टीम इंडिया आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. तर यजमान पाकिस्तान आणि बांगलादेशचा प्रवास साखळी फेरीतच संपला. तर बी ग्रुपमध्ये 2 जागांसाठी अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत चुरस पाहायला मिळत आहे. तर इंग्लंडचा उपांत्य फेरीतील शर्यतीतून पत्ता कट झाला आहे. बी ग्रुपमधून सेमी फायनलमध्ये कोण पोहचणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असताना क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आगामी आशिया कप 2025 स्पर्धेबाबत मोठी अपडेट आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या सप्टेंबरमध्ये एसीसी अर्थात आशियाई क्रिकेट काउन्सिकडून आशिया कप स्पर्धेचं आयोजन केलं जाऊ शकतं. यंदा टी 20i फॉर्मेटनुसार ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेचं आयोजन हे सप्टेंबरमधील दुसऱ्या आठवड्यापासून ते चौथ्या आठवड्यापर्यंत करण्यात येऊ शकतं. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

क्रिकबझनुसार, या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा टीम इंडियाकडेच आहे. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध पाहता एसीसीने उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी केलं आहे. आता हे सामने कुठे होणार? याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र या दोन्ही संघांचे सामने हे यूएई किंवा श्रीलंकेत होऊ शकतात. तसेच बीसीसीआय अर्थात टीम इंडियाकडेच या स्पर्धेचं यजमानपदाचा मान असेल.

एसीसीचा मोठा निर्णय

क्रिकबझनुसार, बीसीसीआय किंवा पीसीबी या दोघांपैकी कुणालाही स्पर्धेचं यजमानपद मिळालं तर त्यांच्यातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी होतील, असा निर्णय एसीसीने घेतला. दोन्ही क्रिकेट बोर्डांचा एकमेकांच्या देशात जाऊन खेळण्यास टोकाचा विरोध आहे. बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये पाठवण्यास तीव्र विरोध दर्शवला. तर यजमान पाकिस्तानही आम्ही कुठेच जाणार नाही, या आपल्या भूमिकेवर ठाम होती. त्यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी उभयसंघातील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचं ठरलं. तसेच याच फॉर्मुलानुसार पुढेही असेच आयोजन केलं जाईल, असं ठरलं होतं.

दरम्यान टीम इंडियाला हायब्रिड मॉडेलनुसार दुबईत खेळण्यासाठी परवानगी आहे. त्यामुळे 2026 साली होणाऱ्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतही भारत-पाक यांच्यातील सामने त्रयस्थ ठिकाणी पर्यायाने दुबईत होऊ शकतात. आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंलेकडे आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.