China And Pakistan's Economy: भारताचे शेजारी असलेले देश चीन आणि पाकिस्तानमध्ये अलीकडेच सोन्याचा मोठा साठा सापडला आहे. यातून या दोन देशांच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट होऊ शकतो. पाकिस्तान दीर्घ काळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे, तर चीनची अर्थव्यवस्थाही अनेक आघाड्यांवर संघर्ष करत आहे. याव्यतिरिक्त, या शोधांचा जगभरातील सोन्याच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो.
अलीकडच्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. भारत, चीन आणि तुर्कियेसह जगातील अनेक देशांच्या केंद्रीय बँका त्यांच्या विदेशी चलनातील सोन्याचे प्रमाण वाढवत आहेत जेणेकरून अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करता येईल. या देशांनी सलग तिसऱ्या वर्षी 1000 टनांहून अधिक सोन्याची खरेदी केली आहे.
चीन जगात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन करतो. गेल्या काही महिन्यांत सोन्याच्या दोन मोठ्या खाणी सापडल्या आहेत. नोव्हेंबर 2024 मध्ये हुनान प्रांतात 1,000 मेट्रिक टन सोन्याचा साठा सापडला. त्याची किंमत सुमारे 82.9 अब्ज डॉलर आहे. जानेवारी 2025 मध्ये चीनच्या अनेक प्रांतांमध्ये 168 टन सोन्याचा साठा सापडला होता. त्यामुळे सोन्याच्या उत्पादनात चीनचा दबदबा अधिक मजबूत झाला आहे.
जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचा वाटा 10% आहे. चीनच्या वाढत्या सोन्याच्या साठ्यामुळे त्याची आर्थिक सुरक्षा आणि राजकीय ताकद वाढणार आहे. जगात सर्वाधिक सोने अमेरिकेत आहे.
पाकिस्तानमध्ये सापडला सोन्याचा साठापाकिस्तानमध्येही सोन्याच्या मोठ्या खाणी सापडल्या आहेत. पंजाब प्रांताचे खाण मंत्री शेर अली गोरचानी यांनी दावा केला आहे की अटॉक परिसरात 2.8 दशलक्ष तोळा सोने आहे. त्याची किंमत सुमारे 700 अब्ज आहे. याशिवाय सिंध आणि काबुल नद्यांच्या संगमावरही सोने सापडल्याचा अंदाज आहे. तेथे बेकायदा खोदकाम सुरू होते, त्यानंतर सरकारने हस्तक्षेप केला.
पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, देशात 1.6 अब्ज टन सोने आहे. देशातील सर्वाधिक सोने बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामध्ये आहे. सध्या पाकिस्तानमध्ये दरवर्षी 1.5-2 टन सोने काढले जाते. बलुचिस्तानमधील रेको डिक प्रकल्पातून पुढील दशकासाठी दरवर्षी 8-10 टन सोने काढले जाऊ शकते, असा विश्वास आहे.
पाकिस्तानला सोन्याचा योग्य वापर करता आला तर त्याची अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. यामुळे त्याचा परकीय चलनाचा साठा वाढू शकतो आणि त्याचे परकीय कर्जावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. पण राजकीय तणाव आणि खाणकामासाठी आवश्यक पायाभूत सुविधांच्या अभावामुळे पाकिस्तानला आपल्या सोन्याचा पुरेपूर फायदा घेणे कठीण होऊ शकते.
पाकिस्तान गेल्या काही काळापासून आर्थिक संकटाशी झुंजत आहे. मात्र, अलीकडच्या काळात परकीय चलनाचा साठा वाढला आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था महाराष्ट्राच्या तुलनेत लहान आहे.