खेडमधील ६३ शाळांची होणार दुरुस्ती
निधीअभावी रखडली होती कामे ; पटसंख्येवरील परिणाम कमी होण्यास मदत
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : तालुक्यातील नादुरुस्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव निधीअभावी मंजूर झालेले नव्हते. जिल्हा नियोजनमधून ६३ शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्यामुळे पालकांना दिलासा मिळाला आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला असला तरीही उर्वरित १३१ वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे घोडे अडलेले आहे.
तालुक्यातील प्राथमिक शाळांच्या इमारतीची स्थिती बिकट आहे. धोकादायक इमारतींमध्ये पाल्यांना पाठवायचे कसे, अशी चिंता पालकांना सतावत होती. त्यामुळे काही पालकांनी प्राथमिक शाळांऐवजी शहरातील शाळांमध्येच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठवणे पसंत केले. त्यामुळे प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमालीची घटली असून, त्याचा परिणाम शाळा बंद करण्या पर्यंत झाला आहे. बहुतांश शाळांना विद्यार्थ्यांअभावी कुलूप ठोकण्यात आले आहे. गतवर्षी तालुक्यातील शिरवली प्राथमिक शाळेच्या दोन वर्गखोल्यांचे छत कोसळले होते. सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पडलेल्या प्रकारामुळे मोठी दुर्घटना टळली होती. या पाठोपाठच पुरे येथेही इमारतीचा पायाच खचला होता. या दोन शाळांपाठोपाठ अन्य नादुरुस्त स्थितीतील शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव शासनदरबारी पाठवण्यात आले होते; मात्र, शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामपंचायत तसेच पालकांकडून शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करूनदेखील पदरी निराशाच पडली होती. येथील शिक्षण विभागानेही शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याकरिता सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पालकमंत्री उदय सामंत यांनी गांभीर्याने लक्ष घालत २०२४-२५ च्या जिल्हा नियोजनमधून साडेतीन कोटींचा निधी मंजूर केला. त्या निधीतून खेड तालुक्यातील ६३ शाळांची दुरुस्ती होणार आहे. त्यासाठी चार महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. खेड शिक्षण विभागाकडून १९४ नादुरुस्त स्थितीतील शाळांमधील वर्गखोल्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवले होते. त्यातील अवघ्या ६३ शाळांना निधी दिला गेला असला तरीही उर्वरित १३१ शाळांमधील वर्गखोल्यांच्या दुरुस्तीचे काय, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.
शिक्षण विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन नादुरुस्त वर्गखोल्यांसाठीही निधी द्यावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. नादुरुस्त शाळांमध्ये वावे, बोरघर, चिंचवली, कसबा नातू आंबये, जामगे, शिवतर, पुरे शिंगरी, दहिवली, घोगरे, मांडवे, बोरज, जांबुर्डे, मोरवडे, निगडे, निळवणे, उधळे, शिरवली, अपेडे, कळवणी, कर्टेल, तुळशी, कशेडी खवटी, भडगाव, भोस्ते, ऐनवली, कुडोशी, मोहाने, दयाळ, फुरूस वेरळ, सुकिवली, बिजघर, चाटव, अस्तान, हुंबरी, सणघर, वरवली येथील गावातील प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
-----
निधी मंजूर झालेल्या शाळा
तालुक्यातील देवघर-निवाचीवाडी, घेरारसाळगड क्र. १ पेठकिल्ला, जैतापूर- कावणकरवाडी क्र. १ पोमनार पाटीलवाडी, बौद्धवाडी, धामणी क्र. १, पलित्रा, घेरापालगड क्र. १, हेदली-सवेणी धामणी विद्यामंदिर, माणी क्र. १. शिंदेवाडी, सवेणी-लिंगायत, उर्दू ऐनवरे, हेदली-चिनकटेवाडी क्र. १, कुळवडी तांबरी, केंद्रीय शाळा मिलें, खोपी लाडवाडी, धनगरवाडी, शिरगाव क्र. १, शिंदेवाडी, वेधेवाडी, खोपी रामजीवाडी, कुंमाड क्र. १, नातूनगर क्र. १ या नादुरुस्त शाळांना निधी देण्यात आला आहे.