चाकण - राज्यातील विविध बाजार समितींत कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे घाऊक बाजारात प्रतिकिलो दहा रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १५ ते २५ रुपये प्रतिकिलोला मिळत आहेत. बाजारभाव वाढीवर सरकारच्या निर्यात धोरणाचा परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना कांदा रडवणार की चांदी करणार, हे येणारा काळ ठरवणार आहे.
राज्यातील विविध बाजारात रब्बी हंगामातील कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे. पुढील दोन ते तीन आठवडे बाजारात लेट खरीप आणि आगाप रब्बी कांद्याची आवक वाढणार आहे. यामुळे बाजारभाव अजून कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.कांद्याची लागवड तसेच उत्पादन यंदा देशभरात वाढणार आहे. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार लागवडीत पंधरा टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीच्या रब्बी हंगामात देशात दहा लाख हेक्टरवर कांदा लागवड होती. मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशात लागवडी या वर्षी अधिक आहेत.
भावातील घसरण ही शेतकऱ्यांच्या मुळावर
रब्बी कांद्याची आवक पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यात वाढली आहे. रब्बी हंगामाची आवक सध्या वाढत आहे. चाकण येथील कांदा बाजारात अगदी वीस हजार क्विंटलच्या पुढे गेलेली आहे. जशी आवक वाढते तसे बाजारभाव घसरत आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
राज्यातील प्रसिद्ध नाशिक, पुणे जिल्ह्यातील चाकण या महत्त्वाच्या बाजारात कांदा निर्यातदार कंपन्या, व्यापारी निर्यातीसाठी कांदा खरेदी कमी प्रमाणात करतात. त्यामुळे देशांतर्गत कांद्याची विक्री करावी लागत असल्याने कांद्याचे बाजारभाव गडगडतात.
-प्रशांत गोरे पाटील, निर्यातदार व्यापारी, चाकण
कांदा साठवणुकीसाठी वखार, छपऱ्या व्यवस्थित नाहीत तसेच कांदा साठवण्यासाठी शासनाची कोणतीही उपाययोजना नाही. शेतकरी कांदा काढणीनंतर लगेच बाजारात विक्रीसाठी आणतो. त्यामुळे आवक वाढते आहे. कांद्याचे बाजारभाव घसरत असल्याने यंदा शेतकऱ्यांना कांदा रडवणार आहे.
-विक्रम शिंदे, शेतकरी