विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कल्याण कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विधवा महिलेला लग्नाचे प्रलोभन दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी १२ तासांत अटक केली आहे. रामनारायण गुप्ता असे अटक आरोपीचे नाव आहे. तो आणि पीडित महिला हे जीन्स पॅन्ट खिसे पॅकिंग व्यवसायात भागीदार होते. मागील सहा वर्षांपासून आरोपी महिलेवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर राम गुप्ताने तिच्याशी जवळीक वाढवली. सुरुवातीला गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे प्रलोभन दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले; मात्र जेव्हा पीडितेने लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने पीडितेला धमक्या देत मारहाण केली, तसेच तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. अखेर महिलेने कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर कोळसेवाडी पोलिसांनी रामनारायण गुप्ता याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अवघ्या १२ तासांत त्याला अटक केली.