Vidarbha vs Kerala Ranji Trophy 2025: नागपूर येथे केरळ व विदर्भ संघांदरम्यान स्पर्धेतील अंतिम सामना रंगला आहे. विदर्भाने पहिल्या डावात ३७९ धावा उभारल्या आहेत. ३ बाद २४ अशी विदर्भाची अवस्था असताना दानिश मेलवार व करूण नायरने २१५ धावांची भागीदारी केली अन् संघाचा डाव सावरला. ज्यामध्ये दानिश मेलवार दीडशतक ठोकले, तक करूण नायरने अर्धशतकी खेळी केली.
चा कर्णधार सचिन बेबीने सकाळी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. केरळच्या मध्यमगती गोलंदाजांनी पहिल्या तासातच तीन विकेट्स घेऊन जोरदार सुरुवात केली. निद्धेश एमडीने पार्थ रेखडेला बाद करत विदर्भाला शून्यावरच पहिला धक्का दिला. त्यानंतर १ धाव करून दर्शन नळकांडे बाद झाला. त्यालाही निद्धेशनेच बाद केले. २४ धावांवर विदर्भाचा तिसरा फलंदाज बाद झाला, ध्रुव शोरे १६ धावांवर माघारी परतला.
मात्र त्यानंतर मालेवार-नायर जोडीने पाहुण्या केरळला वर्चस्व गाजविण्याची संधीच दिली नाही. सुरुवातीला धक्के मिळाल्यानंतर मालेवार-नायर या विदर्भाच्या जोडीने सुरुवातीला सावधपूर्वक व त्यानंतर आक्रमक फटकेबाजी करीत चौथ्या विकेटसाठी ४१५ चेंडूंत २१५ धावांची भागीदारी करून विदर्भाला सामन्यात परत आणले. त्यांनी तब्बल ३०८ मिनिटे चिवट फलंदाजी करताना केरळची गोलंदाजी पूर्णपणे निष्प्रभावी केली.
शतकाकडे वाटचाल सुरू असताना करुण दुर्दैवीरीत्या बाद होताच केरळसाठी डोकेदुखी ठरलेली ही भागीदारी थंडावली. एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात ताळमेळ न राखल्याने नायर ८८ धावा काढून बाद झाला. १८८ चेंडूंचा सामना करणाऱ्या नायरने या खेळीदरम्यान आठ चौकार व एक षटकार मारला.
त्यानंतर दानिश मेलवारने शतकाचे रूपांतर दीडशतकात केले. त्याने १५ चौकार व ३ षटकांच्या मदतीने २८५ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. पण बासीलच्या गोलंदाजीवर मेलवार बाद झाला आणि विदर्भाला मोठा धक्का बसला. त्यानंतर विदर्भाचा डाव घरंगळला. आज दुसऱ्या दिवशी विदर्भाचा पहिला डाव ३७९ धावांवर संपुष्टात आला आहे.