ऐन शिमगोत्सवात खेडमध्ये पाणीटंचाई
मार्चपासून धावणार टँकर ; सुसेरी-देवसडेतून मागणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : तालुक्यात उष्मा वाढत असल्याने उपलब्ध जलस्त्रोतांच्या पाण्याच्या पातळीतही घट होत आहे. ऐन शिमगोत्सवातच ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील सुसेरी-देवसडे येथील मधलीवाडी येथे ५ मार्चपासून पाण्याचा टॅंकर धावण्याची शक्यता पंचायत समितीने टंचाई आराखड्यात व्यक्त केली आहे. यामुळे तालुक्यात यंदा एप्रिलऐवजी मार्च महिन्यातच पाण्याचा पहिला टँकर धावण्याची शक्यतेने शिमगोत्सवात चाकरमान्यांच्या तोंडचे पाणी पळणार आहे.
टंचाई आराखड्यानुसार यंदा एप्रिल ऐवजी मार्च महिन्यातच पाण्याचा टँकर धावण्याची शक्यता पंचायत समितीने वर्तवली आहे. गतवर्षी ता. ८ एप्रिलपासून तालुक्यातील सुसेरी-देवसडे येथे पाण्याचा पहिला टँकर धावला होता. यंदाही याच गावातील मधलीवाडी येथील ग्रामस्थांना पाणीटंचाईची पहिली झळ पोहचणार आहे. ९० लोकसंख्या असलेल्या वाडीमध्ये तालुक्यातील पहिला टँकर धावण्याची शक्यता आहे. ता. ५ मार्चपासून याठिकाणी पाण्याचा टँकर सुरू होईल, अशी नोंदही पंचायत समितीने टंचाई आराखड्यात केली आहे. यापाठोपाठ याच गावातील कदमवाडी, जाधववाडी येथे ता. २२ मार्चपासून तर २७ मार्चपासून बौद्धवाडी व वैरागवाडी येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची नोंद करण्यात आली आहे.
---