Champions Trophy 2025 :यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानने केले. परंतु या स्पर्धेतून केवळ पाच दिवसांत पाकिस्तान बाहेर पडला आहे. सलग दोन पराभवामुळे पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. न्यूझीलंड आणि भारताविरूद्धच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या संघाला बाहेरचा रस्ता धरावा लागला. त्यातच भारताविरुद्ध झालेला पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागला आहे. या पराभवाचे पडसाद पाकिस्तानमध्ये उमटत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ लवकरच पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) आणि टीमच्या खेळाडूंसोबत चॅम्पियन ट्रॉफीतील पराभवावर चर्चा करणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्लाह यांनी यासंदर्भात माहिती दिली.
29 वर्षानंतर आयसीसी टूर्नामेंटचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. यजमानपद असताना चॅम्पियन ट्रॉफीत संघाचा पराभव झाला. मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळला. त्यात त्यांचा 60 धावांनी पराभव झाला. त्यानंतर रविवारी पाकिस्तानचा सामना भारतासोबत झाला. या सामन्यात पाकिस्तानचा मानहानीकारक पराभव झाला. त्यामुळे पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफीतून बाहेर पडला. गुरवारी पाकिस्तानचा सामना बांगलादेशबरोबर होणार होता. परंतु पावसामुळे हा सामना रद्द झाला. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहचला.
पाकिस्तानी वृत्तपत्र द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे सल्लागार राणा सनाउल्ला यांनी एका टीव्ही चॅनलशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान राष्ट्रीय संघाच्या कामगिरीबद्दल वैयक्तिकरित्या बोलतील. तसेच कॅबिनेटमध्ये आणि संसदेत या प्रश्नावर चर्चा करणार आहेत.
2009 नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा यजमान संघ ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसोबत असे घडले होते. तेव्हा आफ्रिकेचा संघ तीनपैकी दोन सामन्यात पराभूत झाला होता.
पाकिस्तान, बांग्लादेश आणि इंग्लंड स्पर्धेतून बाहेर पडले. त्यापैकी कोणत्या टीमला किती रक्कम मिळणार आहे, याबाबत निर्णय टीम कोणत्या स्थानावर असणार त्यावर असणार आहे. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 350,000 डॉलर तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघाला140,000 डॉलर मिळणार आहे.