IND vs PAK : एकदा नाही तर 3 वेळा भिडणार टीम इंडिया-पाकिस्तान! चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान मोठी अपडेट
GH News February 28, 2025 12:11 AM

टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाचा हा दुबईतील एकदिवसीय क्रिकेटमधील सातवा आणि पाकिस्तान विरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीतील तिसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला. कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने ही कामगिरी केली. त्यानंतर आता पुन्हा एकदा या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये हायव्होल्टेज सामन्याचा थरार रंगणार आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप 2025 स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. अवघ्या काही महिन्यांनी पुन्हा एकदा हे दोन्ही संघ भिडणार आहेत. त्यानुसार दोन्ही संघात एक, दोन नाही, तर तब्बल 3 सामने होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा टी 20i फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धेतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सप्टेंबर महिन्यातील दुसर्‍या ते चौथ्या आठवड्या दरम्यान या स्पर्धेचं आयोजन केलं जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत.

तब्बल 3 वेळा भिडणार भारत-पाक!

येत्या 2026 वर्षात टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टी 20i फॉर्मेटनुसार आशिया कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सहभागी 8 संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात येणार आहे. तसेच टीम इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही संघ एकाच गटात असतील. त्यानंतर दोन्ही संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरले तर सुपर 4 मध्ये उभयसंघात दुसरा सामना होऊ शकतो. तर अंतिम सामन्यात दोन्ही संघ पोहचले तर उभयसंघ एकूण तिसऱ्यांदा आमनेसामने असतील. अशाप्रकारे एकूण 3 वेळा भारत-पाक आमनेसामने येऊ शकतात.

स्पर्धेचं आयोजन कुठे?

दरम्यान या स्पर्धेंचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी होणार असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारताकडे आहे. त्यानुसार या स्पर्धेतील सर्व सामने हे भारतात खेळवण्यात आले पाहिजे. मात्र भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामुळे उभयसंघातील सामने हे त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यावरुन सहमती आहे. त्यामुळे टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील सामने हे श्रीलंका किंवा यूएई येथे होऊ शकतात.

एकूण 8 संघ कोणते?

आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, यूएई, ओमान आणि हाँगकाँग हे 8 संघ सहभागी होणार आहेत. नेपाळ यंदा या स्पर्धेसाठी पात्र ठरला नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.