- rat२७p२०.jpg-
P२५N४८०३७
रत्नागिरी : कुवारबाववासियांच्या आंदोलनासंबंधी पत्र उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्याकडे देताना भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थ.
---
कुवारबाव ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष
आंदोलनाचा इशारा ; आकारफोडसह घरकुल प्रस्ताव रखडले
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २७ : रत्नागिरी शहराचे उपनगर म्हणून ओळख बनलेल्या कुवारबाव ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. प्रशासनाच्या लालफिती कारभारामुळे ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे भाजपच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ११ मार्चपासून निर्णायक आंदोलन सुरू करू, असा इशारा कुवारबाव ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
या संबंधी ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवारबावमधील २३ गृहनिर्माण संस्थांचे सुमारे ७५० भूखंड त्यांच्या नावावर करण्यासाठी आकारफोडचा अंमल करणे, कुरण या चुकीच्या नावाखाली ३० झोपडीधारकांचा अडवलेला घरकुल प्रस्ताव त्वरित मंजूर करणे, घनकचरा व एफएसटीपीसाठी गावातील ८० गुंठे जमीन त्वरित ग्रामपंचायतीला हस्तांतरित करणे, कारवांचीवाडी येथील रस्त्यावर अपघाती मृत्यू होऊनही रस्ता न करणाऱ्या ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे, अशा मागण्या ग्रामस्थांनी केल्या होत्या. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, अतिक पाटणकर, महिला तालुकाध्यक्षा प्रियल जोशी, दीपक आपटे, प्रशांत जोशी, शामराव माने यांनी दिले.
दरम्यान, गेली कित्येक वर्षे कुवारबाववासियांच्या मागण्या प्रशासनाने लालफितीत अडकवून ठेवल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ संतापलेले आहेत. या विरोधात आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन व आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
------
....म्हणून आंदोलन करतोय!
ग्रामस्थांच्या मागण्यांविषयी पालकमंत्री यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधलेला होता; मात्र त्यांनी फोन उचलला नाही. तसेच त्यांच्या एका स्वीय सहाय्यकाकडेही निरोप दिलेला होता. ग्रामस्थांचे हे सर्व प्रश्न जिव्हाळ्याचे असल्यामुळे व कित्येक वर्षे प्रलंबित ठेवल्याने नाईलाजाने ११ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. याला दिरंगाई करणारे प्रशासनच जबाबदार आहे, असे भाजप जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे यांनी सांगितले.