मल्लिकार्जुन मंदिरात
भजनाचा कार्यक्रम
रत्नागिरी ः श्री क्षेत्र स्वयंभू आधी काळापासून प्रसिद्ध असलेल्या मल्लिकार्जुन मंदिर टिके येथे महाशिवरात्रीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा टिके कांबळेवाडी नं. ३ शाळेचा भजनाचा कार्यक्रम झाला. भागोजीशेठ कीर यांच्या सहकार्यामुळे या मंदिराची उभारणी झाली आहे. गेल्या वर्षी मल्लिकार्जुन देवस्थानाचा जीर्णोद्धार करण्यात आला. यावर्षी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा टिके कांबळेवाडी नं. ३ या शाळेतील विद्यार्थ्यांनी भैरवी, गवळण, गजर, भक्तीगीत अशा विविध भजनाच्या प्रकारातील गाणी गाऊन उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. ढोलकीची साथ वेदांत शिनगारे, वेद कांबळे, मेघाली सांडीम हिने दिले तर भजनीबुवा म्हणून आयुष्य ठीक, चैतन्या कांबळे, कार्तिकी शिनगारे, प्रेम सांडीम, श्लोक गोविलकर, मिहीर सांडीम, सौम्य सांडीम, अस्मि गोविलकर आदी विद्यार्थ्यांनी भूमिका निभावली. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शकाची भूमिका शीतलकुमार आकुर्डे गुरूजींनी पार पाडली. डाफळेबंधूंनी सूरपेटीवर राग दिला. या वेळी संपूर्ण भाविकांसाठी महाप्रसादाचा लाभ मल्लिकार्जुन देवस्थान कमिटीमार्फत करण्यात आले होते.
----
मंत्री सामंत यांचा
मनसेकडून सत्कार
रत्नागिरी ः मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरीतर्फे मराठी राजभाषा मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाली येथील निवासस्थानी सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. रत्नागिरी जिल्ह्यातील बँक, पोस्ट ऑफिस येथील परप्रांतीय कर्मचारी मराठी भाषेबद्दल दाखवत असलेली अनास्था मनसे पदाधिकाऱ्यांनी मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली. अद्ययावत मत्स्यालयामुळे संशोधन केंद्राचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर, तालुकाध्यक्ष सचिन शिंदे, शहराध्यक्ष बाबय भाटकर, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, वाहतूक सेना जिल्हा चिटणीस रूपेश चव्हाण, महिला आघाडी शहर संघटक बिस्मिल्लाह नदाफ, महिला शहर सचिव संपदा राणा आदी उपस्थित होते.
---
''आयसीएस''मध्ये
शनिवारी परिषद
खेड : सहजीवन शिक्षणसंस्था संचलित आयसीएस महाविद्यालयात १ मार्च रोजी आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. आयसीएस महाविद्यालय व मुंबई येथील भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या परिषदेचा कृषी, लोकसंख्या, पर्यावरण, पर्यटन आणि शाश्वत विकासातील समकालीन समस्या हा विषय आहे. परिषदेत डॉ. अतुल साळुंखे यांचे बीजभाषण होणार आहे. डॉ. हेमंत पेडणेकर, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, डॉ. प्रकाश डोंगरे आदींचे मार्गदर्शन लाभणार आहे. या प्रसंगी संस्था कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, विकास समितीचे चेअरमन अॅड. आनंद भोसले आदी उपस्थित राहणार आहेत. परिषदेत शोधनिबंधाचे सादरीकरणही होणार असून, पुस्तकरूपाने प्रकाशन करण्यात येणार आहे. विद्यार्थी, संशोधक, अध्यापकांनी शोधनिबंध पाठवून परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्या डॉ. अनिता आवटी यांनी केले आहे.