‘त्या’ टपऱ्यांवरील कारवाईचा बार फुसका
खेड पालिकेचे दुर्लक्ष ; मोक्याच्या ठिकाणी बेकायदेशीर उभारणी
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २७ : शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील मोक्याच्या शासकीय जागांवर कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे उभारलेले अनधिकृत टपऱ्या (खोके) अद्ययावत करण्याची कामे सुरू आहेत. त्याकडे नगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे अनधिकृत खोक्यांवरील नगरप्रशासनाच्या कारवाईचा बार फुसका ठरल्याची चर्चा रंगली आहे.
खेड शहरात मोक्याच्या ठिकाणी ३५हून अधिक अनधिकृत खोके उभारून बहुतांश खोक्यांमध्ये दुकानेही थाटलेली आहेत तर काहींनी केवळ खोक्यांची उभारणी करत मोक्याच्या जागा अडवून ठेवलेल्या आहेत. या खोक्यांमुळे रूंद रस्तेही आता अरूंद झाले असून, बकालपणा आला आहे. यापूर्वी नगरप्रशासनाकडून अनधिकृत खोके उभारणाऱ्यांवर रितसर कारवाईचा प्रशासकीय ठराव केला जाणार असल्याचे संकेत देण्यात आले होते. यानंतर कारवाईबाबतची रितसर टिप्पणी तयार करण्याबाबत सूचित करण्यात आले होते; मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटूनही नगरप्रशासनाला अद्याप कारवाईसाठी सवड मिळालेली नाही. समर्थनगर येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीसमोरच काही महिन्यांपूर्वी उभारलेले खोके अद्ययावत करण्याचे कामही दोन दिवसांपासून हाती घेतले आहे. या खोक्यांमध्ये वीजपुरवठाही कार्यान्वित झाला आहे. महावितरणकडून अनधिकृत खोक्यामध्ये वीजपुरवठा कार्यान्वित करण्याच्या दाखवलेल्या तप्तरतेबद्दलही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
------
कोट
अनधिकृत खोक्यांवर कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलणे आवश्यक आहे. पालिकेच्या जागेवर अशा पद्धतीने खोके उभे करून खेड शहर बकाल करण्यात येत आहे. जागोजागी वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झालेला असून, अनधिकृत खोक्यांवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी.
- अॅड. सैफ चौगुले, खेड