मोरक्कोचे राजे मोहम्मद सहावे यांनी यावर्षी ईद उल-अजहा (बकरी ईद)रोजी कुर्बानी देऊ नका असं आपल्या देशातील जनतेला आवाहन केलं आहे. गेल्या सात वर्षांपासून देशात दुष्काळ सुरू आहे. त्यामुळे गुरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या दशकभरात देशातील मेंढ्यांची संख्या 38 टक्क्यांनी कमी झाली आहे. चालू वर्षी देशात सरासरी पेक्षा 53 टक्के कमी पाऊस पडला. पावसाचं प्रमाण घटल्यानं देशात गुरांना चरण्यायोग्य कुरणाच्या प्रमाणात प्रचंड घट झाली आहे. चारा मिळत नसल्यामुळे जनावरांचा मृत्यू होत आहे, परिणामी देशातील मांस उत्पादन देखील घटलं आहे. त्यामुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी देऊ नका असं आवाहन येथील जनतेला मोरक्कोच्या राजांनी केलं आहे.
बकरी ईद हा मुस्लिम धर्मातील सर्वात मोठा सण आहे. बकरी ईद च्या दिवशी मुस्लिम बांधव बकरी किंवा इतर जनावराची कुर्बानी देतात. या जनावराचं मांस ते आपल्या परिवाराला आणि गरीबांना वाटतात. मात्र यावेळी राजे मोहम्मद सहावे यांनी ईद उल-अजहा अर्थात बकरी ईदला कुर्बानी देऊ नये असे आवाहन तेथील जनतेला केले आहे. देशात निर्माण झालेली परिस्थिती जनतेनं लक्षात घ्यावी आणी कुर्बानी टाळावी असं आवाहन येथील राजाने केलं आहे.
मोरक्कोचे धार्मिक व्यवहार मंत्री अहमद तौफीक यांनी बुधवारी राजे मोहम्मद सहावे यांचा संदेश टीव्हीवर जनतेला वाचून दाखवला. प्रत्येक सण हा उत्साहात साजरा केला जावा ही आपल्या देशाची पंरपरा आहे. मात्र देशात जी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, ती देखील लक्षात घ्यावी लागणार आहे, असं अहमद तौफीक यांनी म्हटलं आहे.
मोरक्कोमध्ये गुरांची संख्या झपाट्यानं कमी झाल्यामुळे तेथे मांसाहारी पदार्थाचे भाव गगनाला भिडले आहेत. मांसाच्या किमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता मोरक्कोकडून ऑस्ट्रेलियासोबत करार करण्यात आला आहे. या करारांतर्गत मोरक्को ऑस्ट्रेलियामधून तब्बल एक लाख जनावरांची आयात करणार आहे. ज्यामध्ये उंट, शेळ्या, मेंढ्या, या प्राण्यांचा समावेश आहे.