Pune Police : मारहाण केल्याप्रकरणी पोलिस कर्मचाऱ्याचे निलंबन; पुणे पोलिस दलात खळबळ, भाऊ- बहिणीवरही गुन्हा दाखल
Saam TV February 28, 2025 02:45 AM

अक्षय बडवे 
पुणे
: पुण्याच्या पोलीस दलात कार्यरत एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्या बहीण, भाऊ अन्य काही जणांना सोबत घेऊन एका जनाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल तक्रारीची दखल घेण्यात आली असून पुणे पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या या शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुख्यालयात कार्यरत विजय जाधव असे या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. विजय जाधव या पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. विजय जाधव हे आर कंपनी पोलीस मुख्यालय, शहर या ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांच्यासह त्यांचा भाऊ विकी जाधव, बहिण आणि बहिणीचे पती आणि इतर २ सहकारी यांचेसोबत संगनमत करुन बेकायदेशीर जमाव जमवून हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेवून मारहाण केल्याची तक्रार ओंकारसिंग गुलचंदसिंग भौड यांनी दिली होती. 

निलंबन करत भाऊ- बहिणीवर गुन्हा दाखल 

पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सदर प्रकरणी चौकशी केली. यात विजय जाधव यांनी मारहाण केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर त्यांच्यावर बेशिस्त, बेजबाबदार, पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे व गंभीर गुन्हेगारी स्वरुपाचे वर्तन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर विजय जाधव यांच्यासह त्यांचा भाऊ आणि बहीण यांच्या विरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एकाला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल आहे. 

पोलीस कर्मचाऱ्याचा गोंधळ 
निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला पोलीस आमच्या बाजूने तक्रार दाखल करून घेत नाहीत, म्हणून या शिपायाने पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ  घातला. इतकेच नाही तर तक्रार घेतली नाही म्हणून पोलिस ठाण्यात पोलिस शिपायाने जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. 

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.