पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये साडेपाचच्या सुमारास एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. ही घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली. महाराष्ट्रभर या घटनेवरुन संताप व्यक्त करण्यात आला.
ही तरुणी पुण्याहून फलटणला निघाली होती. त्याच दरम्यान तिला बस डेपोमध्ये आरोपी भेटला. त्याने एका रिकाम्या शिवशाही बसमध्ये तरुणीला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेमुळे पीडित तरुणी प्रचंड घाबरली. मानसिक ताण आल्याने ती काही न बोलता थेट घरी निघाली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
स्वारगेट डेपोमधील बलात्कार घटनेतील आरोपीचे नाव दत्तात्रय गाडे असून तो शिरूरच्या गुनाट गावचा असल्याची माहिती समोर आली.
त्याच दरम्यान दत्तात्रय गाडे हा शिरूरच्या गुनाट गावचा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बलात्कार घटनेनंतर दत्ता गाडे हा गुनाट गावात गेल्याचे समजताच पुणे पोलीस येथे पोहोचले.
आरोपी दत्ता गाडे हा गावातल्या ऊसाच्या शेतामध्ये लपून बसला आहे असा पोलिसांना संशय होता. ग्रामस्थांनीही त्याला दुजोरा दिला. तो गावात आल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली.
ड्रोन कॅमेरे, श्वान पथक यांच्या मदतीने शेतात दत्तात्रय गाडेचा शोध सुरु झाला. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने पोलिसांना शोधमोहीमेत काहीसा अडथळा देखील आला.
पुणे ग्रामीण पोलीस दलातील १०० पोलीस गुनाट गावामध्ये पोहोचले. पुढे १०० पोलीस आणि ग्रामस्थ यांनी मिळून दत्ता गाडेचा शोध घेण्यास सुरूवात केली.
दुपारपासून संध्याकाळपर्यंत पोलिसांनी तब्बल २५ एकर ऊसाच्या शेतामध्ये दत्तात्रय गाडेचा शोध घेतला. पण इतक्या मोठ्या प्रमाणात शोध घेऊनही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले नाही.
बिबट्यांचा वावर आणि अंधार पडायला सुरूवात झाल्याने पोलीस आणि ग्रामस्थ हे परत गुनाट गावामध्ये परतले. १०० पोलिसांची तुकडी ही गुनाट गावाहून पुण्याला जायला निघाली.
पुणे पोलिसांकडून इतकी मेहनत घेऊनही फरार आरोपी दत्तात्रय गाडेचा शोध लागला नाही. दरम्यान आम्ही लवकरच आरोपीला पकडू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.