चिखलदरा : आईनेच चोवीस दिवसांच्या बाळाच्या पोटावर ६५ चटके दिल्याची बाब पुढे आली. चिखलदरा पोलिसांनी याप्रकरणी त्या मुलाच्या आईविरुद्ध बुधवारी (ता. २६) रात्री जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. चिखलदरा तालुक्यातील चिमोरी गावात ही घटना घडली होती. मंगळवारला (ता. २६) प्रकरण उघडकीस आले होते. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी याप्रकरणात चौकशी करण्याचे आदेश चिखलदरा पोलिसांना दिले. पोलिसांनी सदर प्रकरणात मुलाचे वडील राजू लालमन धिकार (वय ३०, रा. चिमोरी, ता. चिखलदरा) यांचे बयाण नोंदविले.
सविस्तर चौकशी केली असता, पित्याच्या बयाणामध्ये पत्नीनेच चोवीस दिवसांच्या मुलाची प्रकृती बिघडल्याने नायलॉनचा काळा धागा गरम करून बाळाच्या पोटावर चटके दिल्याचे सांगितले. त्यानंतर २३ फेब्रुवारीला वडिलांच्या दशक्रियेचा कार्यक्रम आटोपला. कार्यक्रमानंतर त्याच दिवशी सायंकाळी पत्नीने नवजात मुलगा रडत असल्याच्या कारणाने दोराच्या साहाय्याने पोटावर अनेक चटके दिले.
ही बाब लक्षात आल्यानंतर मुलाला आधी हतरू, त्यानंतर चुर्णी व पुढे अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने जिल्हा स्त्री रुग्णालय, अमरावती येथे दाखल करण्यात आले होते. मुलाचे वडील राजू लालमन धिकार यांच्या तक्रारीवरून पत्नी फुलवंती राजू धिकार (वय २७) विरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम आणि अल्पवयीन मुलाची काळजी व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तीन फेब्रुवारीला झाला मुलाचा जन्मतीन फेब्रुवारी २०२५ रोजी मुलाचा जन्म झाला. अचलपूर शासकीय उपजिल्हा रुग्णालयातून मुलाला घरी नेल्यावर राजू धिकार यांचे वडील लालमन धिकार यांचा १३ फेब्रुवारी २०२५ रोजी आजारामुळे मृत्यू झाला.
ग्रीन कॅरिडोअरमध्ये नागपूरला हलविलेचटके दिलेल्या बाळाला हृदयाचा गंभीर आजार व जीवितास धोका असल्याचे समजताच पोलिसांनी ग्रीन कॅरिडोरद्वारे तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत पुढील उपचारासाठी जिल्हा स्त्री रुग्णालयातून बुधवारला (ता. २६) रात्री नागपूरच्या खासगी रुग्णालयामध्ये हलविले. शहर व ग्रामीण पोलिसांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
एसपींनी साधला पालकमंत्र्यांशी संवादघटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पीडित मुलाच्या कुटुंबीयांची हलाखीच्या परिस्थितीमुळे पालकमंत्र्यांनी शासकीय योजनेतून मुलाच्या उपचाराची व्यवस्था नागपूर येथील खासगी रुग्णालयात करून दिली.