महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटसाठी लूट; गुजरातपेक्षा दुप्पट तिप्पट दर
esakal February 28, 2025 03:45 AM

देशातील २०१९ च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्या नंबरप्लेट बदलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्यासाठी राज्यात तीन खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आलंय. जवळपास ६०० कोटींचं हे कंत्राट आहे. पण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात या नंबर प्लेटसाठी दुप्पट ते तिप्पट पैसे आकारले जात आहेत. यावर आता वाहन चालक-मालक प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी संशय व्यक्त केलाय.

एसएसआरपी नंबर प्लेट तयार करण्याचं कंत्राट रॉरमेत्रा सेफ्टि सिस्टिम लिमिडेट, रिअर मेझॉन इंडिया लिमिटेड आणि एफटीए एचएसआरपी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांना देण्यात आलंय. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांसाठी तयार करण्यात येणाऱ्या नंबर प्लेटसाठी वेगवेगळे दर आकारण्यात येत आहेत. यात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील गाड्यांच्या नंबर प्लेटला जास्त पैसे आकारले जात आहेत.

दुचाकीच्या नंबर प्लेटसाठी गोव्यात १५५ तर गुजरातमध्ये १६० रुपये आकारण्यात येतायत. मात्र याच्या जवळपास तिप्पट किंमत महाराष्ट्रात द्यावी लागतेय. महाराष्ट्रात दुचाकीसाठी ४५० रुपये इतकी रक्कम द्यावी लागणार आहे. आंध्र प्रदेशात २४५ आणि झारखंडमध्ये ३०० रुपये आकारले जातायत.

चारचाकी गाड्यांच्या नंबर प्लेटसाठी गोव्यात सर्वात कमी फक्त २०३ रुपये आकारले जातायत. तर महाराष्ट्रात याच नंबर प्लेटसाठी ७५४ रुपये घेण्यात येतायत. गुजरातमध्ये ४६० रुपयांमध्ये चार चाकी गाडीची एसएसआरपी नंबर प्लेट तयार करून दिली जातेय.

अवजड वाहनांच्या नंबर प्लेटसाठी गोव्यात २३२ रुपये आकारले जातायत. गुजरातमध्ये ४८० रुपये तर महाराष्ट्रात ४७५ रुपये मोजावे लागत आहेत. तर आंध्र प्रदेशात ६४९ रुपये आणि झारखंडमध्ये ५७० रुपये आकारण्यात येतायत.

एचएसआरपी नंबर प्लेटसाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल. तुमच्या जवळचं फिटमेंट सेंटर सिलेक्ट करून तुम्हाला दिलेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरवर जा. तिथं व्हेंडर तुम्हाला नंबर प्लेट बसवून देईल. इतर ठिकाणी जर तशीच दिसणारी प्लेट बसवून घेतलीत तर नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. त्यामुळे एसएसआरटी पेंडिग दिसेल आणि याचा फटका वाहनधारकाला बसू शकतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.