अहमदपूर - टेम्पो व दुचाकीच्या धडकेत दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील हगदळ येथील पवन भानुदास डुरे (30-वर्ष) हे चार चाकी वाहने दुरुस्तीचे काम करत असत तर रणजित चंद्रकांत मुंढे (24-वर्ष) यांचे स्वतःचे ट्रॅक्टर असून ते व्यवसाय म्हणून शेती काम करत होते.
अहमदपूर येथुन ते 26 फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास चाकूर तालुक्यातील नळेगाव येथे असलेले नादुरुस्त वाहन दुरुस्ती करण्याच्या संदर्भात दुचाकीवरून जात होते, दरम्यान शिरूर गावातून राष्ट्रीय महामार्ग 361 वरील बाह्य वळण रस्त्यावर जात असताना लातुरकडून नांदेडकडे येत असलेला मालवाहु आयशर क्रमांक एम.एच-26-बी.ई-7534 याची धडक झाली यात दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यु झाला आहे.
ही धडक जोरात स्वरूपाची होती. यात दुचाकी फरपटत गेल्याने घर्षण होऊन पेट घेतला. या घटने संदर्भात अहमदपूर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रणजीत चंद्रकांत मुंडे व पवन भानुदास डुरे हे जिवलग मित्र होते. पवन भानुदास डुरे हे विवाहित असून त्यांना दोन मुलं असून रणजीत मुंडे हे अविवाहित होते. गाडी दुरुस्त करण्यासाठी ते नळेगावला जात असताना पाच सेकंदाच्या फरकाने शिरूर गावातील रस्ता ओलांडून बाह्य वळण रस्त्यावर पोचणार होते.
परंतु अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली. व यामध्ये दोन जिवलग मित्राचा दुर्दैवी मृत्यू झाला. 27 फेब्रुवारी रोजी गावातील सार्वजनिक स्मशान भूमीमध्ये या दोन मित्रांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
राष्ट्रीय महामार्ग 361 वाहने गतीने जात असल्याने वाढत्या दुर्घटना होत आहेत. गावातून बाह्यवळणाकडे जात असताना वाहन चालकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. राष्ट्रीय महामार्गावर वाहने ही भरधाव वेगाने जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. प्रत्येक वाहनचालकांनी गावातील रस्ता बाह्य वळण रस्त्याला जोडलेल्या ठिकाणी वाहनांची गती कमी करावी.
- मंजुषा लटपटे, उपविभागीय अधिकारी, अहमदपूर.