भिवंडी, ता. २७ (वार्ताहर) : महापालिका क्षेत्रातील मालमत्ता करवसुलीच्या नावाने नेहमीच ओरड होत आहे. नवनियुक्त आयुक्त अनमोल सागर यांनीही पालिका अधिकारी विभागप्रमुखांच्या बैठकीत मालमत्ता करवसुलीबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, थकीत मालमत्ता करवसुलीसाठी कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर पालिका क्षेत्रातील ७१ लाखांचा मालमत्ता कर थकवणाऱ्या इमारतींची नळजोडणी खंडित करत कारवाई केली आहे. कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
चौथा निजामपूर नदीनाका या परिसरात फरीद बाग या ठिकाणी मालमत्ता क्रमांक ५१ या तळ अधिक सात मजली इमारतीवर २०१५मध्ये वार्षिक दोन लाख ६३ हजार एवढी करआकारणी केली होती. २०१५ ते आजपर्यंत मालमत्ता कर न भरता या इमारतीचा वापर सुरू होता. ही बाब प्रभाग क्रमांक एकचे सहाय्यक आयुक्त राजू वरळीकर यांच्या निदर्शनात आल्यानंतर कर विभागाचे उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या इमारतीवर राजू वरळीकर यांनी पथकासह कारवाई केली. या कारवाईत इमारतीचे सर्व नळजोडणी खंडित करून तेथील विद्युत मोटर जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, कर आकारणी न करता कर्तव्यात कामचुकार करणाऱ्या भूभाग लिपिक नरेंद्र जाधव व कर निरीक्षक रवींद्र वारघडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. मालमत्ता करवसुलीसाठी प्रशासन कारवाईचा बडगा उचलत अनेक योजना राबवत आहे. पण, आजही शहरातील अनेक मालमत्तांवर कर आकारणी झाली नाही, तर अनेक इमारतींना कर्मचारी अभय देत आहेत. यावर पालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.