भिवंडी, ता. २७ (बातमीदार) : भिवंडी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी नसल्याचे पाहून कार्यालयात घुसून त्यांच्या खुर्चीला हार घालण्याचा प्रकार नुकताच घडला आहे. यानंतर घोषणाबाजी करत चित्रीकरण केल्याने बहुजन विद्यार्थी संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांवर निजामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचे पडसाद पालिकेच्या कार्यालयात उमटले आहेत.
महापालिकेचे उपायुक्त (आरोग्य) यांच्या कार्यालयात प्राथमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन पाटील हे कार्यालयीन बैठकीसाठी उपस्थित होते. याच वेळी त्यांच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात गुरुवारी (ता. २०) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास अनिल वाणी व इतर १० ते १५ व्यक्तींनी मोठ्या आवाजात घोषणाबाजी केली. प्रशासन अधिकारी जागेवर नसल्याचे पाहून दालनात घुसून त्यांच्या खुर्चीला हार घातला. या सर्व घटनेचे चित्रीकरण करून फोटो काढले आणि कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करून त्यांना धमकावले. वाणी हे उपायुक्त (शिक्षण) यांच्या दालनाबाहेर आले. त्यांच्या कार्यालयात शिक्षण विभागाची महत्त्वपूर्ण बैठक सुरू होती. त्याच वेळी वाणी यांनी शिष्टमंडळासह घोषणाबाजी करत बैठकीत विनापरवानगीने प्रवेश करून बैठक बंद पाडली आणि गोंधळ घालत त्यांचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. वादविवादामुळे पालिकेचे सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी आले. त्यांच्यासोबतही विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वादविवाद सुरू केला आणि पालिकेच्या शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी नितीन पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार निजामपूर पोलिस ठाण्यात वाणी आणि इतर १० ते १५ व्यक्तींविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद करून घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रायपुरे करत आहेत.