अंबरनाथ, ता. २७ (वार्ताहर) : माझ्या परिसरातल्या मुलाला ड्रायव्हर म्हणून का नेले? अशी विचारणा करत अंबरनाथमधील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेल्हार ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथमधील शरद पवार गटाचे पदाधिकारी इम्रान खान हे २१ फेब्रुवारीला मित्राच्या लग्नाला वसई येथे गेले होते. या वेळी नेताजी मार्केट परिसरातील एका तरुणाला त्यांनी ड्रायव्हर म्हणून सोबत नेले. मात्र, याचा नेताजी मार्केट परिसरात राहणारे अजहर कुरेशी यांना राग आल्याने त्यांनी चालकाला फोन करत शिवीगाळ केली. चालकाने इम्रान यांना फोन देताच त्यांनाही शिवीगाळ करत दमदाटी केली, असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, खान यांच्या तक्रारीवरून घटनेच्या तिसऱ्या दिवशी २४ फेब्रुवारीला अजहर कुरेशीविरोधात मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील पेल्हार पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी खान यांनी केली आहे. या घटनेनंतर इम्रान खान आणि अजहर कुरेशी या दोघांनीही २२ फेब्रुवारीला एकमेकांविरोधात अंबरनाथ पोलिस ठाण्यात अर्ज दिले आहेत.