बीडमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना यवतमाळमध्ये अशाच प्रकारची घटना घडली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली . दगडाने ठेचून तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. आशिष सोनोने असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. यवतमाळच्या वाघापूर परिसरातील जय महाराष्ट्रनगरमध्ये आज पहाटे चार वाजताच्या सुमारास आशिष सोनोनेची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून चार जणांनी आशिषच्या डोक्यावर दगडाने घाव केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आशिषचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येची माहिती मिळताच यवतमाळच्या लोहारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. आशिषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी लोहारा ४ जणांना अटक केली. अनैतिक संबंधातून आशिषची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यवतमाळ शहरात ८ दिवसांत दोन हत्याकांडाच्या घटना घडल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.