भरधाव गाडी चालवत महिलेला चिरडले, तीन दुचाक्यांना धडक; वडोदऱ्यात त्या रात्री नेमकं काय घडलं?
BBC Marathi March 18, 2025 07:45 AM
ANI

गुजरातमधील वडोदरा शहरातील कारलीबाग परिसरात 13 तारखेला रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला.

भरधाव आलेल्या कार चालकानं तीन दुचाकींना धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर मृत महिलेच्या पतीसह इतर 7 जण गंभीर जखमी झाले.

कार प्रचंड वेगात होती असं अपघातातील पीडितांचं म्हणणं आहे. कार चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा आरोपही करण्यात आला आहे.

मात्र, चालक दारूच्या नशेत होता की नाही हे तपासण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने एफएसएलकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

अपघातानंतर चालक पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडलं.

रक्षित चौरसिया असं या कार चालकाचं नाव असून तो वडोदरा येथील एमएस युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबीचं शिक्षण घेत आहे.

अपघातानंतर रक्षित चौरसिया रस्त्यावर इंग्रजीत 'अनदर राऊंड...अनदर राऊंड' (दुसरी फेरी) आणि 'ओम नमः शिवाय'च्या घोषणा देत होता.

BBC

BBC

हा अपघात गुरुवारी (दि. 13 मार्च) रात्री 11.30 च्या सुमारास झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे. याचे व्हीडिओही समोर आले आहेत.

या प्रकरणी वडोदरा येथील कारलीबाग पोलीस ठाण्यात कारचालकाविरुद्ध कलम 105 अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपघाताच्या त्या रात्री काय घडलं?

13 मार्च रोजी रात्री उशिरा कारलीबाग मुक्तानंद सर्कल दीपाली सोसायटीजवळ हा अपघात झाला.

वडोदरा येथील कारलीबाग परिसरात राहणाऱ्या निशा शाह आपल्या मुलांना घेऊन ॲक्टिव्हावर फिरायला गेल्या होत्या. दरम्यान, रक्षितच्या कारनं त्यांच्या ॲक्टिव्हालाही धडक दिली. या अपघातात निशा आणि त्यांची दोन्ही मुलं गंभीर जखमी झाली आहेत.

या अपघाताबाबत निशा यांचे पती आशिष शाह यांनी कारलीबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घटनेबाबत आशिष शाह यांनी फिर्यादीत म्हटलं आहे की, "दीपाली सोसायटीजवळ एका काळ्या रंगाच्या कारनं दुचाकीला धडक दिली. भरधाव येणाऱ्या कारनं दुचाकीला धडक दिल्यानंतर चालकानं माझ्या पत्नीच्या ॲक्टिव्हाला धडक दिली.

"आधी माझी मुलगी आणि नंतर माझा मुलगा गाडीच्या धडकेने खाली पडले. माझी पत्नी गाडीसह खाली पडली. वाटेत चालकानं दुचाकीवरून जात असलेल्या आणखी एका पुरुष व महिलेला धडक दिली. गाडीचे बॉनेटही उघडले आणि अचानक गाडी थांबली. "

"चालकाच्या बाजूला बसलेला तरुण उतरला आणि पळून गेला. चालक ओरडत गाडीच्या बाहेर आला. घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला पकडलं," असं शाह यांनी म्हटलं.

ANI 13 मार्च रोजी रात्री उशिरा कारलीबाग मुक्तानंद सर्कल दीपाली सोसायटीजवळ हा अपघात झाला.

या घटनेत दुसऱ्या दुचाकीवरून जाणाऱ्या हेमाली पटेल या महिलेचा मृत्यू झाला. मृत हेमालीबेन यांचे पती पुरव पटेल हे गंभीर जखमी असून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे.

अन्य जखमींमध्ये फालुदा खायला गेलेले भाऊ-बहीणही अपघाताचे बळी ठरले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर ड्रायव्हरच्या शेजारी बसलेला त्याचा मित्र बाहेर आला आणि म्हणाला की, 'तो वेडा आहे. त्याला पकडा.'

या घटनेचा व्हीडिओही व्हायरल झाला आहे.

निष्पापांचा बळी

आशिष शाह यांनी तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, "घटनास्थळी उपस्थित लोकांनी रुग्णवाहिका बोलावली आणि अपघातग्रस्तांना उपचारासाठी एसएसजी रुग्णालयात नेण्यात आले.

"घटनेची माहिती मिळताच मी एसएसजी रुग्णालयात पोहोचलो. माझ्या पत्नीच्या पायाला, डोक्याला आणि उजव्या पायाला तर माझ्या मुलीच्या डोक्याला, घोट्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे," असे शाह यांनी सांगितलं.

ANI कार प्रचंड वेगात होती असं अपघातातील पीडितांचं म्हणणं आहे. कारचालक मद्यधुंद अवस्थेत होता, असा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, "पीडित व्यक्तीचं नाव विकास केवलानी होते. तसेच कोमल केवलानी यांच्या हाताला, पायाला आणि तोंडाला जखमा झाल्या आहेत. तर जयेश केवलानी यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे."

संशयित आरोपीनं कायद्याचं भान असूनही 'मृत्यूची शक्यता' माहीत असूनही बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीव धोक्यात घालून अपघात घडवून आणल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

अपघातातील जखमींनी काय सांगितलं?

अपघातात जखमी झालेले विकास केवलानी, त्यांची बहीण आणि चुलत भाऊ हे तिघे दुचाकीवरून जात होते. तीनही भावंडं गंभीर जखमी झाले आहेत.

विकास केवलानी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी फतेहगंज परिसरात राहतो. आम्ही भाऊ-बहीण आणि सोसायटीचे मित्र फालुदा खाण्यासाठी गेलो होतो. नंतर आमच्या गाडीला जोराची धडक दिली. कारचं नुकसान पाहता कारचा वेग 120 पेक्षा जास्त असावा असं वाटतं."

"चालक दारूच्या नशेत होता. त्यानं काय केलं याची त्याला कल्पना नव्हती. गाडीतून उतरतानाही तो आनंदी मूडमध्ये दिसत होता. त्यानं केलेल्या नुकसानीची त्याला कल्पना नव्हती," केवलानी यांनी सांगितले.

विकास केवलानी यांचा चुलत भाऊ जयेश केवलानी म्हणाला, "आम्ही संगमहून घरी जात होतो. माझा पाय फ्रॅक्चर झाला. अपघातानंतर माझा भाऊ एका बाजूला पडलेला आणि माझी बहीण दुसऱ्या बाजूला पडल्याचे मला दिसले. तिथं जमलेल्या लोकांनी रुग्णवाहिका बोलावून आम्हाला तातडीनं रुग्णालयात नेलं."

बीबीसी गुजरातीनं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या हेमाली पटेल यांच्या कुटुंबाशी तसेच तक्रारदार आशिष शहा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही.

आरोपी मद्यधुंद होता का?

आरोपी दारूच्या नशेत होता, असा आरोप अपघातग्रस्तांनी केला आहे. अपघाताच्या दिवशी आरोपी दारूच्या नशेत होता, असा आरोपही करण्यात आला. तसेच, अपघातानंतर डीसीपींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे प्रकरण मद्यपान करून गाडी चालवण्याचे आहे, असं म्हटलं होतं.

या घटनेनंतर वडोदराच्या डीसीपी पन्ना मोमाया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, "वाहन ओव्हरस्पीडिंगमुळे हा अपघात झाल्याचे दिसतं. संदेश मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. अपघातात महिलेचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आरोपी रक्षित चौरसियाला अटक केली आहे.

आरोपी हा वाराणसीचा रहिवासी आहे. प्राणसू चौहान नावाचा तरुण त्याचा सहप्रवासी होता. दारू पिऊन गाडी चालवण्याचं हे प्रकरण असल्याने आम्ही त्यावरही कारवाई करत आहोत. "

मात्र, शनिवारी पन्ना मोमाया यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "आरोपीच्या रक्ताचे नमुने एफएसएलकडे पाठवण्यात आले असून, तो नशेत होता की नाही, हे तपासण्यासाठी अहवालानंतरच कळेल."

UGC वडोदराच्या डीसीपी पन्ना मोमाया

आरोपी रक्षितने नशेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "मी कोणत्याही प्रकारच्या नशेत नव्हतो. घटनेच्या वेळी लोक माझ्यापासून दूर पळत असल्याने मी नशेत असल्याचे बोललो होतो."

आरोपी रक्षित चौरसियानं प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, "आम्ही होलिका दहनासाठी गेलो होतो. मी माझ्या मित्राच्या घरून परतत होतो. कार माझ्या मित्राची होती. ती ऑटोमॅटिक नवीन कार होती. माझ्या गाडीचा वेग 50 ते 55 होता. भरधाव जाणाऱ्या दुचाकीला कारने धडक दिली. कारचे सेन्सर्स पॉवरफुल असल्यामुळे कारच्या एअरबॅग्ज उघडल्या होत्या. एअरबॅगमुळे मला पुढे काहीच दिसत नव्हते आणि अपघात झाला."

रक्षित पुढे म्हणाला, "अपघातानंतर मला मारहाण झाली. एका व्यक्तीचा जीव गेल्याचे दुःख आहे. माझी मुक्तता झाल्यावर मी मृताच्या कुटुंबीयांना भेटेन. मी गधेडा सर्कल पासून निजामपूरला निघालो होतो."

पोलिसांचा तपास कोणत्या दिशेनं?

बीबीसी गुजरातीशी बोलताना डीसीपी पन्ना मोमाया म्हणाले, "घटनास्थळी एफएसएल टीमने टायरच्या खुणा आणि रक्ताचे नमुने घेतले आहेत. घटनास्थळाची नोंद करण्यात आली आहे. आरोपींनी आलेल्या मार्गावरील सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्यात आले आहेत. वाहनाचा वेग तपासण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज एफएसएलकडे पाठवण्यात येणार आहे. आरोपी दिवसभरात कोठे फिरला आणि त्यानं या काळात काय काय केले. याचे आम्ही तांत्रिक विश्लेषण करत आहोत. "

पोलिसांनी आरोपींसोबत घटनास्थळी जाऊन घटनेचं रिक्रएशन केलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.