रस्ते खोदल्याने गैरसोय
भातखळकर यांनी विचारला जाब
मुंबई, ता. ३ : रस्त्यांची कामे करताना अर्धवट रस्ते खोदून ठेवल्यामुळे लोकांना होत असलेल्या गैरसोयीबाबत कांदिवली पूर्वचे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना आज (ता. ३) जाब विचारला. अखेर या कामांमधील अडथळे दूर करून ३१ मेपूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
कांदिवली पूर्व परिसरातील विविध रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यातील अनेक कामे अर्धवट राहिली असून, या कामांकरिता बॅरिकेड लावून रस्ते पूर्ण किंवा अर्धवट बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, अनेक अपघातही होत आहेत. यासंदर्भात तक्रारी आल्यामुळे भातखळकर यांनी आज दिवसभर या सर्व कामांची पाहणी केली.
वारंवार सूचना देऊनही रस्त्यांची कामे अर्धवट का राहतात, कालबद्ध पद्धतीने पूर्ण का होत नाहीत, असे प्रश्न भातखळकर यांनी केले. या अर्धवट कामांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणी येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. त्यावर तसे आश्वासन या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती भातखळकर यांनी दिली.