-हेमंत पवार
कऱ्हाड : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याने बालेकिल्ला राहिलेल्या या जिल्ह्यातही सुरुंग लागला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर शनिवारी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, तर सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने मोठ्या मताधिक्याने बाजी मारल्याने त्यांच्या सत्कारासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार सोमवारी कऱ्हाडला येणार आहेत. एका दिवसाच्या अंतराने पवार काका-पुतण्याचा यशवंतभूमीत होत असलेला दौरा हा आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात दोन्ही नेते काय बोलणार? कोणती नवी समीकरणे जुळणार? याची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीत जिल्हा पुन्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी माजी मंत्री (कै.) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र व काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. उदयसिंह उंडाळकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत आहे. त्यासाठी शनिवारी अजित पवार कऱ्हाड दौऱ्यावर येत आहेत. त्याची जय्यत तयारी सुरू आहे.
सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक कारखान्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच तिरंगी झाली. त्यात माजी मंत्री पाटील यांनी आमदार मनोज घोरपडे व ॲड. उंडाळकर, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कार्यकारिणी सदस्य रामकृष्ण वेताळ व कॉँग्रेसचे निवास थोरात यांच्या दोन्ही पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यामुळे श्री. पाटील यांचा गट चार्ज झाला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फिल्डिंग लावण्यासाठी त्यांच्या गटाला पोषक वातावरण तयार झाले आहे. त्याचदरम्यान कार्यकर्त्यांना बळ देऊन सह्याद्री कारखान्याचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक यांच्या सत्कारासाठी शरद पवार सोमवारी (ता. २१) कऱ्हाडला येत आहेत. त्यांच्या स्वागताचीही जय्यत तयारी श्री. पाटील गटाकडून केली जात आहे.
बॅलेट पेपरचा मुद्दा गाजणार?कऱ्हाड दौऱ्यावर येणारे पवार काका-पुतणे हे त्यांच्या भाषणात काय बोलणार? याची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्री पवार हे ॲड. उंडाळकर यांना काय ऑफर देणार? नवीन घोषणा काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. सह्याद्री कारखान्याची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली. त्यात बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलचा विजय झाला. विधानसभेला निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या असत्या, तर श्री. पाटील यांचाच विजय झाला असता, अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरू आहे. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झडत आहेत. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवरील निवडणुका चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे त्यावर शरद पवार काय भाष्य करणार? याचाही उत्सुकता लागून आहे.