बीड : गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीसंदर्भात बीड हा राज्याचा केंद्रबिंदू बनला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राजकीय वातवरण तापले असतानाच नुकतेच बीडमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्याने एका सरपंचाने काही लोकांना हाताशी धरून एका महिला वकिलाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या एका गावात हा धक्कादायक प्रकार घडला. या सरपंचाने त्याच्या काही कार्यकर्त्यांना घेऊन त्या महिलेला लाठ्या काठ्या आणि पाईपच्या सहाय्याने मारहाण केल्याचे समोर आले आहे. (Beed Crime Female lawyer beaten by 10 men)
हेही वाचा : Sanjay Raut : मोदी, शहांना इंग्रजी येत नसल्याने हिंदीची सक्ती, राऊतांची टीका
समोर आलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई तालुक्यातील सनगाव येथे 36 वर्षीय ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान या महिला वकिलाला शेतामध्ये रिंगण करून अमानुष मारहाण केली. तिला मायग्रेनचा त्रास होते, यामुळे आपल्या घरासमोरील लाऊड स्पीकर तसेच पीठाची गिरण हटविण्यात यावी, अशी मागणी करत सदर महिला वकिलाने तक्रार दाखल केली होती. त्यामुळे संतप्त झालेले गावचे सरपंच आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी सदर महिला वकिलाला शेतामध्ये घेराव घालून अडवले. त्यांना लाठ्या काठ्या आणि पाईपच्या मदतीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये जबर जखमी झालेल्या महिला वकिलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांनंतर आता तिला घरी पाठवण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकाराबाबत सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. यासंदर्भात केलेल्या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण करण्यात आली. या महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा ,लाऊडस्पीकर लाऊ नयेत, घरापुढील पिठाच्या गिरण्या काढाव्यात, याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या.” तसेच, आमदार जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, “मारहाणीत जबर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यानंतर या महिला वकिलांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरुषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?” असा सवाल त्यांनी यावेळी केला.