आयपीएल 2025 मध्ये रविवारी 20 एप्रिलला डबल हेडर अर्थात 2 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. मात्र साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे डबल हेडरमधील दुसऱ्या सामन्याकडे लागून आहे. या सामन्यात आयपीएलमधील 2 यशस्वी संघात महामुकाबला होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातून फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा युवा आयुष म्हात्रे पलटणविरुद्ध आयपीएल पदार्पण करु शकतो.
वसईतील 17 वर्षीय युवा आयुष म्हात्रे याला चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्या जागी संधी देण्यात आली आहे. ऋतुराजला दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे चेन्नईने आयुषसाठी 30 लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. त्यानंतर आता आयुष आपल्या घरच्याच मैदानात चेन्नईकडून आयपीएल पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
आयपीएलकडून एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन एक व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या 19 सेकंदांच्या व्हीडिओत आयुष वानखेडे स्टेडियममध्ये सीएसके हेड कोच स्टीफन फ्लेमिंग आणि बॅटिंग कोच मायकल हसी यांच्या मार्गदर्शनात बॅटिंग करताना दिसतोय. त्यामुळे आयुषचं मुंबई विरुद्ध पदार्पण जवळपास निश्चित असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. मात्र आयुषला संधी मिळणार की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल.
आयुषला आयपीएलचा अनुभव नाही, मात्र त्याला वानखेडेच्या खेळपट्टीबाबत माहिती आहे. त्यामुळे सीएसकेकडे आयुषच्या अनुभवाचा फायदा करुन घेण्याची संधी आहे.
आयुषचा यलो आर्मी चाहत्यांसाठी खास मराठीतून व्हीडिओ
आयुषने ऑक्टोबरमध्ये फर्स्ट क्लास डेब्यू केला. आयुषने तेव्हापासून 9 फर्स्ट क्लास मॅचमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व केलं आहे. आयुषने या 9 सामन्यांमधील 16 डावांमध्ये 2 शतकं आणि 1 अर्धशतकासह 504 धावा केल्या आहेत. तसेच आयुषने 7 लिस्ट ए मचेसमध्ये 2 सेंच्युरीसह 458 रन्स केल्या आहेत. तसेच आयुष बॉलिंगही करतो. आयुषने लिस्ट ए क्रिकेटमधील 4 डावांमध्ये 11.28 च्या सरासरीने 7 विकेट्स घेतल्या आहेत.