सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे पालिका क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेला स्थानिकांचा विरोध होत आहे. अशातच एखाद्या विभागात क्लस्टर योजना नियोजित आहे. त्या ठिकाणी क्लस्टर, ठाणे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचण्याआधी काही खासगी व्यक्ती, बिल्डर रहिवाशांशी संपर्क साधत असल्याने योजनेबाबतची विश्वासार्हता संपल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली.
ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा सामूहिक विकास करण्यासाठी राज्य शासनाने क्लस्टर योजना आणली. त्यानुसार ठाणे शहरात ४९ आराखडे तयार करण्यात आले आहेत. संजय किसननगर येथे क्लस्टरचे काम सुरू असून अन्य भागात अद्याप योजनेबाबत संभ्रम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ज्या भागात योजना राबविण्यात येणार आहे, तेथे बिल्डर आणि त्यांचे सहकारी रहिवाशांशी संपर्क साधत आहेत. खासगी व्यक्ती क्लस्टरबाबत पुढाकार घेत असल्याने अनेक भागात योजनेबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. सिद्धेश्वर तलाव, हंसनगर भागातील ४० वर्षे जुन्या १९ अनधिकृत इमारतींच्या प्रतिनिधींनी आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. या वेळी बैठकीस क्लस्टर विभागाचे अधिकारी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपस्थित होते. या वेळी उपस्थित ४० हून अधिक प्रतिनिधींना थेट क्लस्टर आणि पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करता आल्याने संभ्रम दूर झाला. या कामी क्लस्टरचे प्राधिकृत अधिकारी नेमण्यात आले असून ते याबाबत रहिवाशांना अधिकृत माहिती देतील, असेही केळकर यांनी सांगितले.
---------------------------------------------
एखाद्या विभागात क्लस्टर योजना नियोजित आहे. त्या ठिकाणी आधी क्लस्टर आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी जाऊन रहिवाशांशी संवाद साधायला हवा. योजनेचे माहितीपत्रक देऊन योजना कशा पद्धतीने राबवण्यात येईल, रहिवाशांचे हंगामी पुनर्वसन, त्यांना मिळणारी घरे, क्षेत्रफळ, सोयी-सुविधा याबाबतची माहिती द्यायला हवी.
- संजय केळकर, आमदार