अमित शाह, राजनाथ सिंह यांचे नाव चर्चेत : राज्यांमध्ये देखील संयोजक असणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (रालोआ) पहिल्यांदाच अध्यक्ष नियुक्त करण्याची तयारी आहे. ही जबाबदारी भाजपच्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळणार आहे. भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आल्यावर रालोआ अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शाह किंवा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याकडे ही जबाबदारी सोपविली जाऊ शकते असे रालोआतील एका घटक पक्षाच्या नेत्याने सांगितले आहे.
आघाडीत सामील 41 पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात उत्तम काम करत आहेत. परंतु दीर्घकाळापासून आघाडीतील घटक पक्षांना स्वत:चे मुद्दे मांडता यावेत याकरता वरिष्ठ नेत्याची गरज भासत होती. रालोआत अध्यक्ष नियुक्त झाल्यास समन्वय चांगला राहणार असल्याचे एका अन्य घटक पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे.
आघाडीत समन्वयाची भूमिका यापूर्वी रालोआ संयोजक पार पाडत होता. हा संयोजक सरकार आणि घटक पक्षांदरम्यान सेतूचे काम करत होता. मागील 11 वर्षांपासून रालोआत संयोजक नेमण्यात आलेला नाही. रालोआ विरोधी पक्षात असताना ही जबाबदारी शरद यादव यांच्याकडे होती.
घटक पक्षांनी रालोआचा अध्यक्ष नियुक्त करण्याची सूचना भाजपसमोर केली आहे. या प्रकरणी भाजपने सकारात्मक भूमिक घेतली आहे. तसेच आता राज्य स्तारावर संयोजक नियुक्त करण्याचाही विचार आहे. राज्यात घटक पक्षांमधील सर्वात वरिष्ठ नेत्याला संयोजक केले जाण्याची शक्यता आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी भेट झाली असून यादरम्यान या मुद्द्यावर त्यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.
भाजप अध्यक्षाच्या निवडीची घोषणा लवकरच
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षावरून 16 एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्नाटक, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांच्या पक्ष प्रदेशाध्यक्षांच्या नावावरही चर्चा झाली. पुढील काही दिवसांत अनेक प्रदेशाध्यक्षांची घोषणा होऊ शकते. यानंतरच राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे.