आयपीएल 2025 स्पर्धेचा मध्यान्ह पार पडला असून हळूहळू प्लेऑफचं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. अजूनही सर्वच संघांना प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी आहे. मात्र काही संघांसाठी हे गणित खूपच किचकट आहे. त्यापैकी एक संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स.. राजस्थान रॉयल्स संघाची या स्पर्धेतील कामगिरी सुमार राहिली आहे. पण दोन सामन्यांचा निकाल हा धक्कादायक लागला आहे. हातात असलेले दोन सामने गमवण्याची वेळ आली. दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात सहज विजय होईल असं वाटत होतं. पण या दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे राजस्थान रॉयल्स संघावर फिक्सिंगचे आरोप लावले गेले आहे. राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या एड हॉक कमिटीचे कन्वेनर जयदीप बिहानी यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. बिहानी यांनी आरोप केला होता की, लखनौ विरुद्ध 2 धावांनी सामना गमावला तो सामना फिक्स होता.
जयदीप बिहानी यांच्या आरोपानंतर बीसीसीआयने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच केलेले आरोप निराधार असल्याचं सांगितलं आहे. तसेच मॅच फिक्सिंग वगैरे असं काहीच झालेलं नाही. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, ‘आरसीएमध्ये लवकरच निवडणुका होणार आहेत आणि सर्वांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अशी खोटी विधानं केली जात आहे.’ मॅच फिक्सिंगच्या आरोपानंतर राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने बीसीसीआयकडे तक्रार केली होती. यानंतर बीसीसीआयने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजस्थान रॉयल्स संघाची या स्पर्धेतील सुरुवात पराभवाने झाली होती. सनरायझर्स हैदराबादने पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सचा धुव्वा उडवला होता. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र आतापर्यंत खेळलेल्या 8 पैकी 6 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्सला पराभूत करत आशा पल्लवीत केल्या होत्या. मात्र त्यानंतर सलग तीन पराभवांना सामोरं जावं लागलं. आरसीबीने 9 विकेट्सने , दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये आणि लखनौ सुपर जायंट्सने दोन धावांनी पराभूत केलं.