बऱ्याचदा जेव्हा आपण पोट साफ करण्यासाठी संडासात जातो तेव्हा शौच झाल्यावर त्यात जेवणाचे अर्धवट तुकडे संडासच्या भांड्यात तसेच राहिलेले दिसतात, जसे की कॉर्न अर्थात मक्याचे दाणे, बिया किंवा भाज्यांचे छोटे तुकडे. हे आपल्याला खूप विचित्र वाटू शकते किंवा घाणही वाटू शकतात. या गोष्टींमुळे काही जण खाण्याचे पदार्थही खाणे सोडून देतात. जरी हे कधीकधी घडू शकते. पण या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करणे योग्य नाही.
हे वारंवार घडत असेल तर ते चिंतेचा विषय असू शकते. शौचात अन्न दिसण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की खराब पचन, हाय फायबर आहार घेणे, खाण्याची चुकीची पद्धत. त्यामुळे तुम्हाला जर आश्चर्य वाटत असेल तर आपण या लेखातून अधिक माहिती घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतात तज्ज्ञ
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टच्या मते, ही नेहमीच चिंतेची बाब नसते. कधीकधी अन्नाचा काही भाग पचत नाही आणि तो शौचामध्ये दिसणे अगदी सामान्य असते. विशेषतः जेव्हा तुम्ही बीन्स किंवा कॉर्नसारखे फायबरयुक्त पदार्थ खाल्ले असतील. या गोष्टींचा बाहेरील भाग कठीण असतो, जो सहज पचत नाही. याशिवाय, अन्न योग्यरित्या न चावल्यामुळे तुमच्या पचनसंस्थेला जास्त काम करावे लागू शकते. अशा परिस्थितीत, अन्न पूर्णपणे पचत नाही आणि त्याचा काही भाग शौचात दिसू शकतो.
बेली फॅटमुळे त्रस्त आहात? सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा ‘या’ पेयांचे सेवन, पोट होईल स्लिम
कधी करावी चिंता?
जर शौचात वारंवार पदार्थ दिसत असतील आणि पोटदुखी, अतिसार, थकवा किंवा अशक्तपणासारखी लक्षणेदेखील दिसून येत असतील तर हे एखाद्या गंभीर समस्येचे लक्षण असू शकते. असे अनेक आजार आहेत ज्यामध्ये अन्नाचे तुकडे मलमध्ये येऊ शकतात. हे आजार नक्की कोणते आहेत आणि काय परिणाम होऊ शकतो आपण पाहूया.
सिलिएक डिसीज
सिलिएक डिसीझमध्ये अन्नाचे कणदेखील शौचामध्ये आढळू शकतात. हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे, जो गहू, बार्ली आणि राईमध्ये आढळणाऱ्या ग्लुटेनच्या सेवनामुळे लहान आतड्याला नुकसान पोहोचवतो. ही आजार शौचात सतत पदार्थ अपचन होऊन दिसत असतील तर होऊ शकतो हे लक्षात घ्या.
स्वादुपिंडाची समस्या
स्वादुपिंड हा एक महत्त्वाचा पचन अवयव आहे, जर त्यात समस्या असेल तर पाचक एंजाइमच्या उत्पादनावर परिणाम होतो. या स्थितीत देखील अन्नाचे कण मलामध्ये आढळू शकतात. पॅन्क्रिएटिक समस्या अधिक उद्भवतात आणि त्रास होतो. तसंच शौचालाही यामुळे त्रास होऊ शकतो.
लॅक्टोज इन्टॉलरन्स
लॅक्टोज इन्टॉलरन्स ही पचनाशी संबंधित समस्या आहे, ज्यामध्ये व्यक्ती लॅक्टोज योग्यरित्या पचवू शकत नाही. या समस्येत, शरीरात लॅक्टेज नावाच्या एंजाइमची कमतरता असते, जी लॅक्टोजचे विघटन करते जेणेकरून शरीर ते शोषू शकेल. या समस्येत, दूध, दुग्धजन्य पदार्थ किंवा अन्न पचवण्यात समस्या येते. या स्थितीत, अन्नाचे कण शौचात राहिलेले दिसून येतात
आयबीएस (इरिटेबल बौएल सिंड्रोम)
आयबीएस हीदेखील एक पचन समस्या आहे, जी पचनसंस्थेवर परिणाम करते. त्याची लक्षणे पोटात पेटके येणे, फुगणे, अतिसार आणि बद्धकोष्ठता आहेत. या परिस्थितीत अन्नाचे तुकडे पोटात राहतात आणि शौचाला झाल्यावर ते तसेच त्यामध्ये बाहेर पडताना दिसून येतात
Constipation Reasons: शौचासाठी संघर्ष करावा लागतोय, ही आहेत त्यामागची 6 कारणे
क्रोहन किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस
क्रोहन किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा दाहक आतड्यांचा आजार, जो पोषक तत्वांचे शोषण करण्यास अडथळा आणतो. यामुळे रोजच्या शीमध्ये अर्थात शौचात अन्नाचे तुकडेदेखील दिसू शकतात. जर ही समस्या अधूनमधून येत असेल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही, परंतु जर हे वारंवार होत असेल आणि इतर लक्षणे देखील दिसत असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.