Pahalgam attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे म्हटले जात आहे. परंतु पाकिस्तान या हल्ल्याच्या निषेध करण्याऐवजी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत आहे. पाकिस्तान आपल्या दहशतवादी कृतींपासून थांबत नाही. पाकिस्तानचे उपप्रंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनी आगीत तेल टाकणारे वक्तव्य केले आहे. इस्लामाबादमध्ये पत्रकारांशी बोलताना, त्यांनी म्हटले आहे की, “जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी झालेला हल्ला करणारे स्वातंत्र्यसैनिक असू शकतात.”
सिंधु नदी करार रद्द केल्यावर मुहम्मद इशाक दार म्हणाले, पाकिस्तानच्या २४ कोटी लोकांना पाण्याची गरज आहे… तुम्ही ते थांबवू शकत नाही. हे युद्धाचे कृत्य मानले जाईल. कोणतेही निलंबन किंवा उल्लंघन स्वीकारले जाणार नाही. जर भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आमचा देशही त्याला योग्य प्रत्युत्तर देईल, असा इशाराही दार यांनी दिला. जर पाकिस्तानवर थेट हल्ला झाला तर त्यालाही प्रत्युत्तर दिले जाईल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीही गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. त्या बैठकीनंतर सिंधू पाणी करारांतर्गत पाकिस्तानसाठी राखीव ठेवलेल्या पाणी थांबवले तर हा प्रयत्न युद्धाचा गुन्हा मानला जाईल.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मुहम्मद आसिफ यांनी भारत पाकिस्तानवर हल्ला करणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, आमच्या नागरिकांना भारताने नुकसान पोहचवले तर भारताचे नागरिकही सुरक्षित राहणार नाही. आम्ही भारताच्या प्रत्येक हल्ल्यास उत्तर देऊ.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानचे नाव न घेता स्पष्ट शब्दांत संकेत दिले. पहलगाम दहशतवादी हल्ला करणारे आणि हल्लाच्या कट शिजवणाऱ्यांना कल्पनेपेक्षा कठोर शिक्षा मिळेल. संपूर्ण दहशतवादाचा नायनाट केला जाईल. २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात २२ एप्रिल २०२२ रोजी सर्वात मोठा हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यंटकांचा मृत्यू झाला.